मी अमरावतीचा सायन्सस्कोर मैदान बोलतोयं...राज्य, राष्ट्रीय नेत्यांच्या सभांचे साक्षीदार

By गणेश वासनिक | Published: April 7, 2024 09:50 PM2024-04-07T21:50:58+5:302024-04-07T21:51:45+5:30

राजीव गांधी, बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, साेनिया गांधी आदी नेत्यांनी गाजवल्या सभा

I am talking ScienceScore ground of Amravati... | मी अमरावतीचा सायन्सस्कोर मैदान बोलतोयं...राज्य, राष्ट्रीय नेत्यांच्या सभांचे साक्षीदार

मी अमरावतीचा सायन्सस्कोर मैदान बोलतोयं...राज्य, राष्ट्रीय नेत्यांच्या सभांचे साक्षीदार

अमरावती : अमरावती : विधानसभा, लोकसभा निवडणूक प्रचार सभा अथवा सामाजिक, शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर चिंतन, मंथन किंवा राजकीय पक्षांचे मेळावे येथेच झाले आहे. अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी आपल्या सभा येथेच गाजवल्या आहेत. त्यांच्या अभूतपूर्व संवाद शैलीतून परिवर्तन घडल्याचा इतिहासाचीही नोंदही येथेच झाली आहे. होय मी सायन्सस्कोर मैदान बोलतोयं... लोकसभा निवडणूक २०२४ साठी आता सज्ज झालो आहे.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर १९५१  मध्ये पहिली लोकसभा निवडणूक झाली. १९५२ ते १९८० या दरम्यान मोठ्या प्रचार सभांचे फॅड नव्हते. थेट गावागावात भेटी-गाठी, लोकांशी संवाद यावर उमेदवारांचा अधिक भर होता.

मात्र, सायन्सस्कोर मैदानावर पहिली राजकीय सभा १९८४ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी काँग्रेसच्या उमेदवार उषाताई चौधरी यांच्या प्रचारार्थ घेतली होती, अशी माहिती जुन्या पिढीतील जाणकारांनी दिली. तर १९९२ मध्ये सायन्सस्काेर मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रकाश भारसाकडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर शिवसेना-भाजपा युतीच्या नेत्यांनी सभा याच मैदानावर गाजवल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत भाजपाचे लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, रिपाइंचे रामदास आठवले यांच्याही सभा झाल्या आहेत.

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीसुद्धा याच मैदानावरून मतदारांना साद घातली आहे. बसपाच्या सुप्रिमो मायावती, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मनसेचे नेते राज ठाकरे, बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हे मैदान गाजवले आहे. १९८९ मध्ये सुदाम देशमुख यांच्या प्रचारासाठी सायन्सस्कोर मैदानावर अभूतपूर्व अशा गर्दीची सभा झाली होती.
मोठ्या मताधिक्क्याने सुदाम देशमुख यांचा विजय झाला होता. विशेषत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा सायन्सस्कोर मैदानावर व्हायची आणि त्यांच्या ठाकरे शैलीतील भाषणानंतर सामान्य शिवसैनिक विचारांची शिदोरी घेऊन पेटून उठायचा, हा देखील इतिहास अमरावतीच्या जनतेने अनुभवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही सभा

सायन्सस्कोर मैदानावर २०१४ मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजप-सेना युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली हाेती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते सुभाष देसाई, रिपाइं नेते रामदास आठवले हे मंचावर उपस्थित हाेते. ३० मार्च २०१४ रोजी या एकाच दिवशी अकोला, नांदेड आणि अमरावती येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्याची नोंद आहे.

इंदिरा गांधींची परतवाडा, तिवस्यात प्रचार सभा

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७८ मध्ये काँग्रेसचे उमेदवार भय्यासाहेब ठाकूर यांच्या प्रचारासाठी तिवसा येथे सभा प्रचार सभा घेतली होती. त्यानंतर परतवाडा येथे भाऊसाहेब भोकरे यांच्यासाठी सभा घेण्यात आली. मात्र, अमरावती येेथे इंदिरा गांधी यांची सभा झाली नाही, अशी माहिती आहे.

Web Title: I am talking ScienceScore ground of Amravati...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.