‘टॅटू’ पाहायला आला अन् आरोपी झाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 05:00 AM2022-03-10T05:00:00+5:302022-03-10T05:00:54+5:30
घटनास्थळी प्रेयसीचा गबरुशी संवाद सुरू असतानाच तिच्या जावयाच्या भावाने त्याला ओळखले. तू यहॉ कैसे? या विचारणेपासून सुरू झालेली ‘तू तू मै मै थेट ‘फायर’पर्यंत पोहोचली. अन् तो तिला घेऊन अमरावतीतून रफुचक्कर झाला. इकडे त्याच्यासह चाैघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले. दोघे गजाआडदेखील झाले. तीदेखील नागपुरात सापडली. ती ‘लव्हस्टोरी’ तेथेच थांबली नाही, तर आपणास कुणीही पळविले नाही, आपण स्वत:हून त्याच्यासोबत गेल्याची कबुली देऊन तिने त्या अपहरण नाट्यात नवा ट्विस्ट आणला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘मैने टॅटू निकाला है, तुम जल्दीसे देखने आओ’ असा कॉल येताच ‘तो’ देशी कट्टा व तीन मित्रांना सोबत घेऊन नागपूरहून अमरावतीसाठी निघाला. रात्री १२.३० च्या सुमारास पोहोचला अन् स्वत:विरुद्ध गुन्ह्याची नोंद करुन बसला. अमरावतीमध्ये केलेला गोळीबार नागपुरच्या गबरुला आरोपी बनवून गेला.
७ मार्च रोजी रात्री १२.४० च्या सुमारास बालाजी प्लॉट भागात हवेत फायर करुन आपल्या साळीला पळवून नेल्याची तक्रार राजापेठ पोलिसात नोंदविल्या गेली होती. तत्पूर्वी घटनास्थळी प्रेयसीचा गबरुशी संवाद सुरू असतानाच तिच्या जावयाच्या भावाने त्याला ओळखले. तू यहॉ कैसे? या विचारणेपासून सुरू झालेली ‘तू तू मै मै थेट ‘फायर’पर्यंत पोहोचली. अन् तो तिला घेऊन अमरावतीतून रफुचक्कर झाला. इकडे त्याच्यासह चाैघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले. दोघे गजाआडदेखील झाले. तीदेखील नागपुरात सापडली. ती ‘लव्हस्टोरी’ तेथेच थांबली नाही, तर आपणास कुणीही पळविले नाही, आपण स्वत:हून त्याच्यासोबत गेल्याची कबुली देऊन तिने त्या अपहरण नाट्यात नवा ट्विस्ट आणला आहे.
गबरू ऊर्फ अस्मित खोटे (२५), शानू ठाकूर (२६), प्रमेश अधपाका (२६) व प्रफुल्ल दमाहे (२६, सर्व रा. नागपूर) यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे हे रात्री १ वाजताच मोबाईल लोकेशन घेऊन नागपूर रोडने आरोपींचा शोध घेऊ लागले. एक टीम ऑटोने पाठविली. दुसऱ्या पथकाने संशयित म्हणून ताब्यात घेतलेले प्रमेश व प्रफुल्ल हे गबरूच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्याचे त्यांच्या मोबाईलमधील कॉल लॉगवरून स्पष्ट झाले. गबरूची प्रेयसी तिच्या बहिणीच्या संपर्कात होती. बहिणीसोबत ऑटोत असलेले पोलीस असल्याचे व प्रमेश, प्रफुल्ल हे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजताच गबरू व शानू ठाकूर हे तिला घेऊन मासोद, शेवती मार्गाने नागपूरला पोहोचले. चारही आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते. तरूणी तिच्या बहिणीला पोलिसांत तक्रार करू नकोस, आम्ही येतो, असे सांगत होती. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच ते नागपूरकडे पळाले. मात्र, त्या दोघांसह अपहृत तरुणीची सुटका करून राजापेठ पोलिसांनी अवघ्या काही तासात या अपहरणनाट्याचा पर्दाफाश केला. मुख्य आरोपींचा शोध सुरु आहे.
आपल्याला कुणीही पळविले नाही
गबरु व शानू ठाकूर हे त्या तरुणीला घेऊन नागपूरला पळून गेल्याचे स्पष्ट होताच राजापेठचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा मापारी व चार अंमलदार नागपुरात पोहोचले. तेथे लोकेशन घेऊन शोध घेतला असता शानू ठाकूरच्या घरी ती तरुणी आढळली. तेथे तिचे जबाब नोंदविण्यात आले. आपण टॅटू दाखविण्यासाठी गबरुला बोलावले. तेथे राडा झाल्याने त्याने हवेत फायर केला. आपले प्रेमसंबंध असल्याची कबुली तिने दिली. त्यामुळे अपहरणाच्या गुन्ह्यातील ‘हवा’ निघून गेली. विशेष म्हणजे, शानू ठाकूरच्या आईचा मोबाईल क्रमांक तरुणीच्या मोबाईलमध्ये ‘मम्मी’ म्हणून सेव्ह होता. दीड वर्षापूर्वी साक्षगंधात धिंगाणा घालून गबरुनेच तिचे लग्न मोडले होते.
आपणच त्याला टॅटू दाखविण्यासाठी अमरावतीत बोलावले होते. आपले कुणीही अपहरण केले नाही, असे त्या तरुणीने जबाबात सांगितले. दोन्ही मुख्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.
- मनीष ठाकरे, ठाणेदार