उद्धव ठाकरे म्हणाले, माझे मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न नव्हते पण...
By उज्वल भालेकर | Published: July 10, 2023 01:51 PM2023-07-10T13:51:52+5:302023-07-10T13:52:57+5:30
पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत
अमरावती : माझे मुख्यमंत्री व्हायचे स्वप्नच नव्हते. मला शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा होता. आजही माझा तोच निर्धार आहे. तसे वचन मी माझ्या जन्मदात्याला म्हणजेच हिंदू ह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना दिला होते. यासंदर्भात अमित शहा यांच्याशीही तसेच बोलणे झाले होते. आणि त्यांनी ते मान्यही केले होते. परंतु त्यावेळी घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे मी अनपेक्षित पणे मुख्यमंत्री झाल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी अमरावतीमध्येही आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. परंतु यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, हा दौरा सर्व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आहे. मातोश्रीवर सर्व कार्यकर्त्यांना भेटणे शक्य नसल्याने मीच त्यांच्या भेटीसाठी आल्याचे ते म्हणाले.
"मी घरी बसून होतो, मात्र मी घरं फोडली नाही, तुम्ही घरफोडे आहात"
ठाकरे यांच्या अमरावती आगमनामूळे शहरात भावी प्रधानमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर झळकत आहेत, त्यामुळे ते प्रधानमंत्री पदाचे दावेदार आहेत का? या प्रश्नाचे उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले. मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते मी अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झालो. माझा निर्धार हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा आहे. जर माझी मुख्यमंत्री पदाचीच इच्छा नव्हती तर प्रधानमंत्री विचार नाहीच. परंतु जर मी प्रधानमंत्री झालोच तरी काय फरक पडणार आहे. आणीबाणी नंतर जनता पक्षाला प्रचाराची मुभा तरी दिली होती. म्हणूनच जनता पक्ष सत्तेत आला होता. पु.ल. देशपांडे, दुर्गा भागवत सारखे ज्येष्ठ साहित्यिक मैदानात उतरले होते. त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या होत्या. परंतु आता ही मुभा देखील आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह असल्याचेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.