रिपाइं ऐक्य फसवे; घोडे, गाढव एकत्र बांधणे अशक्य - आनंदराज आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 01:41 PM2022-10-10T13:41:25+5:302022-10-10T13:44:42+5:30
''सध्याचे सत्ताधारी हे सत्ता टिकविण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार''
अमरावती : रिपाइं ऐक्याचे यापूर्वी अनेकवेळा प्रयोग करण्यात आले. परंतु, या ऐक्यावर माझा विश्वास नाही. ही शुद्ध फसवणूक आहे. कारण घोडे, गाढव हे एकाच ठिकाणी एकत्र आणणे, हे अशक्य आहे. नेत्यांना एकत्र आणण्यापेक्षा समाजाला एका जागी आणण्यावर माझा विश्वास असल्याचे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले. ते रिपब्लिकन सेनेच्या विभागीय कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करण्यासाठी रविवारी अमरावती शहरात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.
आनंदराज आंबेडकर हे पहिल्यांदाच अमरावतीमध्ये आले होते. शहरातील विविध सामाजिक संघटनांनी त्यांचे शासकीय विश्रामगृह येथे भेटी घेत स्वागत केले. यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना आनंदराज आंबेडकर म्हणाले की, सध्या देशात अघोषित आणीबाणी आहे. सध्याचे सत्ताधारी हे सत्ता टिकविण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहेत. शासकीय यंत्रणेचा चुकीचा वापर करून ते विरोधकांना अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारला विरोध करणारे हे देशद्रोही अशी वागणूक सध्या देशात विरोधकांना मिळत आहे. बाबासाहेबांच्या धर्मांतराला विरोध करण्यासाठी आमच्याच मंडळींचा वापर ते करीत असल्याचे सांगत त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला.
रिपब्लिकन ऐक्यावर बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले, यापूर्वीही रिपाइं ऐक्य झाले होते. त्याचे परिणाम आम्ही पाहिले आहेत. घोडे, गाढव, कुत्रे एकाच खोलीत एकत्र बांधणे शक्य आहे का, असा प्रतिप्रश्नच त्यांनी केला. नेत्यांना एकत्र आणण्यापेक्षा समाजाला एकत्र आणण्यासाठी काम करणार असून, आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे ते म्हणाले. अमरावतीमध्ये या निवडणुकीसाठी सर्व संघटना एकत्र येत असल्याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले.