‘उपाशीपोटी गेलं वं मायं लेकरू!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:37 PM2019-01-18T23:37:52+5:302019-01-18T23:38:34+5:30
शाळेला उशीर होईल म्हणून वैभव जेवण न करता लवकरच निघून गेला तो न परतण्यासाठी. ‘उपाशी पोटी गेलं वं मायं लेकरू!’ असा हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा आईने फोडला. वडिलांच्याही डोळ्यांत अश्रूंचा ओघ थांबत नव्हता. वैभव गावंडेचे पार्थिव उचलताना नातेवाइकांचा आक्रोश पाहून समाजमनही हेलावले.
वैभव बाबरेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शाळेला उशीर होईल म्हणून वैभव जेवण न करता लवकरच निघून गेला तो न परतण्यासाठी. ‘उपाशी पोटी गेलं वं मायं लेकरू!’ असा हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा आईने फोडला. वडिलांच्याही डोळ्यांत अश्रूंचा ओघ थांबत नव्हता. वैभव गावंडेचे पार्थिव उचलताना नातेवाइकांचा आक्रोश पाहून समाजमनही हेलावले.
आर्थिक स्थिती जेमतेम असलेल्या कुटुंबातील वैभव गावंडे याचे वडील हरिदास हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आजी, आई-वडील, एक भाऊ व दोन बहिणी असे त्याचे कुटुंबीय. लहानपणापासून लाडत वाढलेल्या वैभव हा शांत व सोज्वळ स्वभावाचा होता. कुटुंबीयांच्या प्रत्येक कामात तोच पुढाकार घेऊन हातभार लावायचा. त्यामुळे कुटुंबीयांचा तो लाडका होता. दररोज घरून जेवण करूनच वैभव शाळेत निघायचा. शुक्रवारी तयारी करीत असताना थोडा उशिरा झाला. स्कूल बस घ्यायला येईल, हॉर्न वाजवेल, या दडपणातून वैभव घड्याळाच्या काट्यावर लक्ष ठेवूनच होता. दहाचा ठोका झाला आणि जेवण न करताच तो घराबाहेर पडला. आईने दाराजवळ आली. जेवण करून जा म्हणून सांगितले. मात्र, उशीर होत असल्याने वैभवने तिचे काही एक ऐकले नाही. स्कूल व्हॅनचा हॉर्न वाजला आणि तो धावत जाऊन वाहनात बसला. हीच माय-लेकराची शेवटची भेट ठरली. वर्गमित्रांसोबत गप्पा करीत तो शाळेत पोहोचला. शाळेतील वर्ग सुरू झाले आणि त्यानंतर मित्रांसह तो पडक्या खोलीत गेला. तेथे भिंत अंगावर कोसळल्याने वैभवाचा मृत्यू झाला.
वैभवच्या कुटुंबातील सदस्याला शाळेत नोकरी
मृत्युमुखी पडलेला वैभवच्या मृताच्या कुटुंबातील एका सदस्याला शाळेत नोकरी देण्याचे आश्वासन याप्रसंगी आ. बच्चू कडू यांनी दिले. मृत वैभव तसेच जखमी मुलांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत तसेच शाळा व्यवस्थापनातील दोषींनाही निलंबित करण्याचे आश्वासनदेखील आ. कडू यांनी दिले. याशिवाय जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारल्याचे आ. कडू यांनी सांगितले.
काळजाचा तुकडा हिरावल्याने आक्रोश
वैभवच्या मृत्यूची वार्ता ऐकताच हरिदास गावंडे हे शेतातील काम सोडून शाळेकडे बेफाम धावत सुटले. घरी असलेली आई, भाऊ व बहिणीदेखील हातातील कामे सोडून शाळेत पोहोचले. वैभवचा मृतदेह पाहून एकच आक्रोश सुरू झाला. हातपाय आपटत हंबरडा फोडणाऱ्या वैभवच्या आईचा आक्रोश पाहून समाजमन हेलावून गेले होते. पत्नी, मुलांचा आक्रोश व रडणे पाहून वडिलांनाही अश्रू अनावर झाले. गावकरी व मित्रमंडळी गावंडे कुटुंबाला धीर देत होते. मात्र, त्यांना आवरणे कठीण होते.