बाथरूमच्या छिद्रातून ‘आय लव्ह यू’ची चिठ्ठी!
By प्रदीप भाकरे | Published: July 14, 2023 04:57 PM2023-07-14T16:57:29+5:302023-07-14T16:58:15+5:30
चिठ्ठीसोबत टाकले क्रिमचे पाऊच; नंतर मागितली माफी
अमरावती : अल्पवयीन मुलगी आंघोळ करत असताना बाथरूमच्या छिद्रातून आय लव यू असे नमूद असलेली चिठ्ठी फेकण्यात आली. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने सोबत एक क्रिम पाऊचदेखील कागद गुंडाळून पाठविले. सरमसपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी १३ जुलै रोजी सकाळी ८.३०च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी, सरमसपुरा पोलिसांनी आरोपी रवींद्र (३५, अचलपूर) याच्याविरुद्ध विनयभंग व पोक्सोचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, गुरुवारी सकाळी ती अल्पवयीन मुलगी आंघोळ करत बसताना अचानक कोणीतरी बाथरूमच्या भिंतीला असलेल्या छिद्रामधून एक कागदाची गुंडाळी बाथरूममध्ये टाकली. ती गुंडाळी तिने उचलून पाहिली असता त्यामध्ये एक चिठ्ठी होती. त्यात हिरव्या शाईने ‘आय लव्ह यू यार’ असे मराठी व इंग्रजीमध्ये लिहिले होते तसेच त्याखाली इंग्रजीमध्ये ‘रवि’ अशी सहीदेखील होती. त्यामध्ये चिठ्ठीसोबत एका क्रिमचे छोटे पॅकबंद पाऊच होते. त्यामुळे ती प्रचंड घाबरली.
म्हणाला, चुकी झाली
ती कशीबशी घरात पोहोचली त्यावेळी तिला बाथरूमच्या चौकटीसमोर आरोपी रवि हा दिसला. नजरानजर झाल्यानंतर तो वॉल कंपाउंडच्या भिंतीवरून उडी मारून पळून गेला. त्यानंतर मुलीने ती चिठ्ठी व क्रिमसह एकूणच घडलेली घटना आई-वडिलांना सांगितली. त्यावर पीडिताच्या वडिलांनी आरोपीला हे काय? अशी कडक शब्दात विचारणा केली. त्यावेळी माझी चूक झाली, मला माफ करा, अशी विनवणी त्याने केली. मात्र, आता माघार घेतली तर आरोपी काहीही करू शकतो, या भावनेतून पीडिताच्या वडिलांनी मुलीला घेऊन पोलिस ठाणे गाठले