‘मी सावित्री’ पोहोचले पुण्यात
By Admin | Published: April 18, 2017 12:30 AM2017-04-18T00:30:52+5:302017-04-18T00:30:52+5:30
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित ‘मी सावित्री’ हा एकपात्री प्रयोग शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठात सादर करण्यात आला.
महिला सक्षमीकरण : वरूडच्या यशश्रीचा एकपात्री प्रयोग
वरुड : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित ‘मी सावित्री’ हा एकपात्री प्रयोग शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठात सादर करण्यात आला. वरूडची यशश्री काशीकर ‘मी सावित्री’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देत असून आतापर्यंत तिने राज्यभरात अनेक प्रयोग सादर केले आहेत.
स्थानिक महात्मा फुले कला वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालयाची बीएसस्सी अभ्यासक्रमाची व राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी असेलेल्या यशश्रीने एका वर्षात ‘मी सावित्री’चे २० हून अधिक प्रयोग सादर केले आहेत. या प्रयोगाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, स्त्री शिक्षण, सतीप्रथा व महिलांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुलेंनी केलेला संघर्ष याची माहिती यशश्री आपल्या कलाविष्कारातून देते. विशेष म्हणजे हे सर्वप्रयोग नि:शुल्क सादर केले जातात.
पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे, रासेयोचे राज्य संपर्कअधिकारी डॉ. अतुल साळुंके, डॉ.प्रभाकर देसाई यांनी तिच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. यशश्रीच्या या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य देवानंद अतकरे यांच्यासह प्राध्यापकांचा पूर्ण पाठिंबा असतो. तिने आपल्या यशाचे श्रेय माता-पिता व शिक्षकांना दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)