तुझ्या नावाचं मी इनिशल टॅटूनं गोंदलं! अल्पवयीन मुलीला गुलाब देऊन केले ‘प्रपोझ’, नागरिकांनी बदडले
By प्रदीप भाकरे | Published: March 1, 2023 05:31 PM2023-03-01T17:31:50+5:302023-03-01T17:32:33+5:30
Amravati News सैराटमधील झिग झिंग झिंगाट या ओळी वास्तवात उतरू पाहण्याचा मनसुबा घेऊन तो थेट एका मंदिरात पोहोचला. तेथे बसलेल्या मुलीला त्याने प्रपोझही केले. मात्र हाय रे दैव. तिला ते पसंत पडले नाही. मग काय ती ओरडली. अन् त्याला मंदिरातील नव्हे तर नागरिकांकडून यथेच्छ प्रसाद मिळाला.
प्रदीप भाकरे
अमरावती: आता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं, तुझ्या नावाचं मी इनिशल टँटूनं गोंदलं, हात भरून आलोया, लई दुरून आलोया, आन करून दाढी भारी परफ्युम मारून आलोया, आगं समद्या पोरात, म्या लई जोरात रंगात आलंया, झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट’ सैराटमधील या ओळी वास्तवात उतरू पाहण्याचा मनसुबा घेऊन तो थेट एका मंदिरात पोहोचला. तेथे बसलेल्या मुलीला त्याने प्रपोझही केले. मात्र हाय रे दैव. तिला ते पसंत पडले नाही. मग काय ती ओरडली. अन् त्याला मंदिरातील नव्हे तर नागरिकांकडून यथेच्छ प्रसाद मिळाला.
गाडगेनगरमधील एका मंदिरात २८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी सायंकाळी सातच्या सुमारास चेतन संजय नागिदवे (२२, रा. चिंचखेड, ता. अमरावती) याच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, आरोपी संजय हा या मुुलीचा नेहमीच पाठलाग करून तिला त्रास देतो. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ती अल्पवयीन मुलगी गाडगेनगर ठाण्याच्या हददीतील एका मंदिरात तिच्या मैत्रिणीसोबत भोजन करून होमवर्क करत होती. ती रोज त्या मंदिरात भोजनाचा डबा खाऊन मग एसटीने गावाकडे जाते, हा दिनक्रम आरोपीला माहित असल्याने मंगळवारी दुपारी तो त्या मंदिरात पोहोचला. हातात गुलाबाचे फुल घेऊन त्याने तिला प्रपोझ केले. तू माझ्याशी लग्न कर, मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझे नाव माझ्या हातावर देखील गोंदले आहे. असे म्हणून त्याने तिचा विनयभंग केला.
पोलिस आले न् घेऊन गेले
अचानक पुढ्यात येऊन थेट गुलाबाचे फुल देत छेड काढल्याने ती अल्पवयीन मुलगी चांगलीच घाबरली. त्यामुळे ती जीवाच्या आकांताने ओरडली. तो आवाज बाहेरच्या नागरिकांपर्यंत पोहोचला. तिच्या मैत्रिणींनीही मदतीसाठी हाक दिली. एक तरूण मंदिरात शिरून एका अल्पवयीन मुलीची छेड काढत असल्याचे लक्षात येताच उपस्थितांनी चेतनला चांगलाच चोप दिला. तेवढयात गाडगेनगर पोलीसही तेथे पोहोचले. जमाव बदडत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला गाडगेनगर पोलिसांनी अटक केली. तर पिडित वडिल व मोठ्या बहिणीला बोलावून घेतले. सुमारे एकतास तो ड्रामा चालला. प्रपोझएैवजी त्याला किक मिळाली.