मी प्रेमविवाह करणार नाही, मुलाबरोबर पळून जाणार नाही; विद्यार्थिनींना शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 04:08 PM2020-02-14T16:08:30+5:302020-02-14T16:13:47+5:30
महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर टेम्भुर्णी गावात सुरू आहे.
अमरावती - 'व्हॅलेंटाइन्स डे'च्या पूर्वसंध्येला तरुणाई गुलाबी रंगात रमली असताना, चांदूर रेल्वेच्या महिला कला, वाणिज्य महाविद्यालयातील
विद्यार्थिनींनी प्रेमविवाह न करण्याची सामूहिक शपथ घेतली. हुंडा घेणाऱ्या तरुणाशी लग्न करणार नाही आणि कुटुंबीयांनी हुंडा देऊन लग्न लावलेच तर भविष्यात सुनेसाठी हुंडा घेणार नाही, अशीही शपथ विद्यार्थिनींनी घेतली.
महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर टेम्भुर्णी गावात सुरू आहे. त्या शिबिरात ही शपथ घेण्यात आली. प्रदीप दंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामागे प्रेमातून सातत्याने होणाऱ्या हिंसक घटनांची पार्श्वभूमी आहे. शपथ देण्यापूर्वी विद्यार्थांना ‘युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर दंदे यांनी मार्गदर्शन केले. तरुण विद्यार्थिनींवरील वाढत्या अत्याचाराचा विषय देखील त्यादरम्यान उलगडण्यात आला.
त्यानंतर मुलींना ही शपथ देण्यात आली. यावेळी प्यारेलाल सूर्यवंशी, अशोक पळवेकर , राजेंद्र हावरे हे उपस्थित होते. शिबिरातील विद्यार्थिनी श्रेया वऱ्हेकर, भावना तायडे, मृणाल पाचखेडे, वैष्णवी गोखे, श्रेया जैन, अर्चना जैन, निशा नाईक, रुचिता रंगारी, पल्लवी सदबोरे, तेजस्वी बोबडे, भुवनेश्वरी देशमुख, अंकिता वानखडे, संगीता साऊतकर यांनीही विचार व्यक्त केले.