शेतकऱ्याची मुलगी नि गवंडी कामगाराची पत्नी झाली आयएएस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:00 AM2021-02-06T05:00:00+5:302021-02-06T05:00:52+5:30
माधुरी गजभिये यांनी सन २०१९ मध्ये आयएएसची परीक्षा दिली होती. त्या उत्तीर्णदेखील झाल्या होत्या, मात्र, नियुक्तिपत्र आणि प्रशिक्षणाची तारीख येईल तेव्हाच जाहीर करायचे, असा निर्णय घेतला होता, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तेलंगणा येथे ७ मार्चपासून त्यांचे प्रशिक्षणा सुरू होत आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षण तळेगाव ठाकूर व बारावी तिवसा येथील देवराव दादा महाविद्यालयातून केली. अमरावती येथील श्री शिवाजी व केशरबाई लाहोटी महाविद्यालयातून उच्चशिक्षण घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मनात प्रबळ इच्छाशक्ती असली की, कुठल्याही परिस्थितीत ध्येय गाठता येते. हे शब्दश: खरे केले आहे शेतकऱ्याची मुलगी अन् गवंडी कामगाराच्या पत्नीने. माधुरी गजभिये (खोब्रागडे) असे आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या या महिलेचे नाव आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी तळेगाव ठाकूर येथे जाऊन माधुरी गजभिये यांचा सत्कार केला.
माधुरी गजभिये यांनी सन २०१९ मध्ये आयएएसची परीक्षा दिली होती. त्या उत्तीर्णदेखील झाल्या होत्या, मात्र, नियुक्तिपत्र आणि प्रशिक्षणाची तारीख येईल तेव्हाच जाहीर करायचे, असा निर्णय घेतला होता, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तेलंगणा येथे ७ मार्चपासून त्यांचे प्रशिक्षणा सुरू होत आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षण तळेगाव ठाकूर व बारावी तिवसा येथील देवराव दादा महाविद्यालयातून केली. अमरावती येथील श्री शिवाजी व केशरबाई लाहोटी महाविद्यालयातून उच्चशिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतानाच सन २०१४ मध्ये टोंगलाबाद (ता. चांदूर रेल्वे) येथील योगेश गजभिये यांच्याशी विवाह झाला. आई सावित्री आणि वडील महेंद्र खोब्रागडे हे दोघेही अल्पभूधारक शेतकरी. त्यांनी मुलीला शिकविले. तो वसा पती योगेश यांनी चालविला. आर्थिक स्थिती बेताची असली तरी स्पर्धा परीक्षांच्या तयारी करण्यासाठी लागणारे बळ उभे केले. पुणे येथील ओजेनेक ॲकेडमीकडून ऑनलाईन मार्गदर्शन मिळविले. फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार आणि सावित्रीच्या शिक्षणाचा वारसा यामुळे मी कठीण परिस्थितीतून आयएएस होऊ शकले, असे माधुरी गजभिये म्हणाल्या.
‘यशोमतींताईंच्या स्नेहाने भारावले’ : माधुरी गजभिये
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी तळेगाव ठाकूर येथे आई-वडिलांच्या घरी असलेल्या माधुरी गजभिये यांचे कौतुक केले. इतरांना आयएएस होण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी स्वतंत्र निधीतून एक अभ्यासिका वजा वाचनालयास आयएएस माधुरी गजभिये हे नाव देण्याचा संकल्प केला. पालकमंत्र्यांनी स्नेहाने मारलेली मिठी ही आयुष्यात कायम स्मरण राहील. एका महिलेचे यश ही महिलाच जाणू शकते, असे माधुरी गजभिये याप्रसंगी म्हणाल्या.