बर्फगोळ्यात घातक ईसेंस

By admin | Published: March 17, 2017 12:11 AM2017-03-17T00:11:25+5:302017-03-17T00:11:25+5:30

उन्हाळा सुरू झालाय. आता थंडगार बर्फगोळ्यांकडे विद्यार्थी धाव घेणार. मोठ्यांनाही त्याचा मोह होणार.

Ice Age Fatal Erosion | बर्फगोळ्यात घातक ईसेंस

बर्फगोळ्यात घातक ईसेंस

Next

विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात : अनेक आजार बळावण्याची शक्यता
अमरावती : उन्हाळा सुरू झालाय. आता थंडगार बर्फगोळ्यांकडे विद्यार्थी धाव घेणार. मोठ्यांनाही त्याचा मोह होणार. पण, सावधान! बर्फगोळ्यासाठी वापरण्यात येणारा बर्फ दूषित पाण्यापासून तयार केला जातोय. बर्फगोळ्याला आकर्षक व चवदार बनविण्यासाठी वापरले जाणारे इसेंसही आरोग्यासाठी घातक आहे. यातून विविध आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उन्हाळ्यात शाळा-महाविद्यालयांसमोर रंगीबेरंगी, थंडगार बर्फगोळा विक्रीला येतो. विद्यार्थ्यांचा ओढा याबर्फगोळ्यांकडे असतोच. परंतु बर्फगोळ्यांचे अंधाधूंद सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. बर्फगोळा तयार करताना वापरला जाणारा खाद्यरंग (ईसेंस) अतिशय घातक आहे.
त्याचा बर्फगोळ्यांच्या निर्मितीत मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. शिवाय आरोग्यासाठी अत्यंत घातक अशा सॅकरिनचा साखरेला पर्याय म्हणून वापर होतो. सॅकरिनचा पाक करून त्याचा वापरही केला जातो. जीभेचे चोचले पुरविण्यासाठी व उन्हाची दाहकता शमविण्यासाठी शाळकरी विद्यार्थी बर्फगोळ्यांच्या हातगाड्यांवर धाव घेतात.

‘सॅकरिन’ घातकच
अमरावती : अवघ्या ५ ते १० रूपयांमध्ये हा रंगबीरंगी बर्फ गोळा मिळत असल्याने त्याकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असतो. बर्फगोळा विक्रेत्यांनी अन्न व प्रशासन विभागाकडे कोणतीच नोंदणी केली नसून किंवा कोणताही परवाना घेतला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे एफडीएचे अधिकारी अनाधिकृत बर्फगोळा विक्रेत्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारणार का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बर्फगोळ्यांसाठी वापरले जाणारे खाद्यरंग कमी दर्जाचे तर नाहीत ना, हे तपासण्यासाठी त्या रंगांचे नमुने घेऊन जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरणाऱ्या बर्फगोळ्याच्या साहित्याची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली जात आहे.
बर्फगोळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आकर्षक खाद्यरंगांच्या पाकामध्ये साखरेऐवजी सॅकरिनचा वापर करण्यात येतो. बाजारपेठेत सॅकरिन साखरेच्या तुलनेत स्वस्त दरात मिळत असल्याने त्याचा वापर विक्रेत्यांना परवडतो. मात्र, यातून खाणाऱ्यांना घातक आजार जडू शकतात. बर्फगोळ्याच्या ग्राहकांमध्ये विद्यार्थ्यांचीच संख्या अधिक असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला थेट बाधा पोहोचत आहे. त्यामुळे सॅकरिनचा वापर थांबविण्याकरिता कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

बर्फाच्या लादीलाही संक्रमण
सातुर्णा परिसरात सर्वाधिक बर्फ कारखाने आहेत. येथून शहरात रोज बर्फाच्या लाद्या विक्रीकरिता आणण्यात येतात.परंतु हा बर्फ तयार करण्यासाठी दूषित पाण्याचा वापर केला जातो. लाद्या आणताना त्यांची काळजीही घेण्यात येत नाही. केरकचरा या लादीला चिकटतो. तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हाता-पायांची घाणही या लादीला बरबटते. तसेच विक्री करताना सुद्धा त्यांची योग्य काळजी घेण्यात येत नाही. त्यामुळे संक्रमण होते. याचाच वापर बर्फगोळा तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध आजारांचे संक्रमण होते. त्यामुळे बर्फ कारखान्यांची सुद्धा एफडीएने तपासणी करावी. शिवाय नागरिकांनीही बर्फजन्य पदार्थ खाताना काळजी घेणे गरजेचे आहे.

हे आजार
बळावण्याची शक्यता
बर्फ जर दूषित पाण्याने तयार केला जात असेल तर तो खाण्यात आल्यास अनेक आजार बळावू शकतात. यामध्ये डायरिया, कावीळ, टायफाईड व पाणीजन्य आजार होण्याची शक्यता असते. तसेच सॅकरिन व बर्फाचे दूषित पदार्थ खाल्ल्याने पोटाचे आजार होतात. पचनक्रिया कमी होणे, भूक मंदावणे ही लक्षणे दिसून येऊ लागतात. हे आरोग्यासाठी घातक आहे.

दुषित बर्फाचे गोळे खाण्यात आल्याने पोटाच्या आतडीवर सूज येणे, पचनक्रि या कमी होणे, भूक मंदावणे, डायरिया आदी आजार होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळयात बर्फगोळा किंवा बर्फजन्य पदार्थ खाताना दक्षता घेणे गरजेचे आहे.
- मनोज निचत
हृदय व मधुमेहतज्ज्ञ
अमरावती.

Web Title: Ice Age Fatal Erosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.