आयसीयू, ऑक्सिजन बेडची मारामार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:12 AM2021-04-13T04:12:10+5:302021-04-13T04:12:10+5:30
अमरावती : जिल्हा सीमेलगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढल्याने तेथील रुग्ण अमरावती जिल्ह्यात उपचारार्थ दाखल होत आहेत. जीव ...
अमरावती : जिल्हा सीमेलगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढल्याने तेथील रुग्ण अमरावती जिल्ह्यात उपचारार्थ दाखल होत आहेत. जीव वाचणे महत्त्वाचा, अशी प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक शासकीय व २३ खासगी कोविड हॉस्पिटल आयसीयूचे ८२ टक्के व ऑक्सिजनचे ६७ टक्के बेड व्याप्त आहेत. अशीच स्थिती राहिल्यास एक-दोन दिवसांत आयसीयू व ऑक्सिजन बेडची मारामार होणार असल्याचे स्पष्ट आहे.
जिल्ह्यात सध्या ४०० ते ५०० कोरोनाग्रस्तांची नोंद अलीकडे होत आहे, यात सध्या ८ ते १२ टक्के व फेब्रुवारी व मार्च महिन्यात सरासरी ३० ते ४० टक्के या प्रमाणात पॉझिटिव्हिटीची नोंद झाली होती. आता कोरोनाग्रस्तांचा ग्राफ काहीसा माघारला आहे. मात्र, लगतच्या नागपूर, अकोला, वाशिम, बुलडाणा, वर्धा जिल्ह्यात संसर्ग वाढला आहे. नागपूर जिल्ह्यात नवे कोरोनाग्रस्त व संक्रमितांचे मृत्यू यांचे रोज नवे उच्चांक स्थापन होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरच आव्हान उभे ठाकले आहे. तत्काळ आरोग्य सेवा मिळणे महत्त्वाचे असल्याने रुग्णांसह नातेवाईकांची धाव अमरावती जिल्ह्याकडे आहे. त्यामुळे आठवडाभरापूर्वी शहरात ओस पडलेले कोविड हॉस्पिटल सध्या हाऊसफूल्ल झाल्याचे चित्र आहे.
नागपूर व अन्य जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यात उपचारार्थ झाल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. याशिवाय काही प्रमाणात औषधांचाही तुटवडा निर्माण होत आहे. यात खासगी रुग्णालयात ऑक्सिजन व रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण होत आहे. अन्य जिल्ह्यातल्या रुग्णांनी येथील आयसीयू व ऑक्सिजन बेड व्यापले असताना जिल्ह्यात संसर्ग वाढल्यास येथील रुग्णांनी कोठे जावे, हा प्रश्न विचारला जात आहे.
बॉक्स
१० रुग्णालयांत आयसीयू हाऊसफुल्ल
जिल्ह्यात २३ खासगी व एक शासकीय कोविड रुग्णालय आहे. यापैकी १० खासगी रुग्णालयांतील १२९ आयसीयूमधील बेड व्याप्त असल्याने येथे हाउसफुल्ल स्थिती आहे. याशिवाय पाच रुग्णालयात फक्त प्रत्येकी एकवर व एका हॉस्पिटलमध्ये दोन बेड रिक्त, अशी अवस्था आहे. या सर्व रुग्णालयात ४०९ आयसीयू बेड संख्या असताना ३३१ बेड व्याप्त झाल्यामुळे केवळ ७५ आयसीयू बेड शिल्लक आहेत.
बॉक्स
सहा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड फुल्ल
शहरातील सहा रुग्णालयांतील ६२ ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्याप्त असल्याने येथेही हाऊसफुल्लची स्थिती द्भवली आहे. एकूण २४ रुग्णालयात ६६९ ऑक्सिजन बेडची उपलब्धता असतांना सध्यास्थितीत ४४४ बेड व्याप्त असल्याने २२५ शिल्लक आहेत. यामध्ये पीडीएमएमएसीमधील ५८बेडचा समावेश आहे.
बॉक्स
नागपूरच्या रुग्णांनी अर्धेअधिक रुग्णालय व्यापले
नागपूर जिल्ह्यात सध्या कोरोनाचा विस्फोट झाल्याने बेडची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे तेथील ५० चेवर रुग्ण येथील शासकीय कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. याशिवाय २३ खासगी रुग्णालयातील अर्धेअधिक बेड सध्या नागपूर जिल्ह्यातील रुग्णांनी व्यापले आहे.
याशिवाय लगतच्या वर्धा, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ तसेच मध्यप्रदेशातील रुग्ण अमरावती शहरात उपचार घेत आहेत.
बॉक्स
जिल्ह्यातील गंभीर रुग्णांनी जायचे कुठे?
जिल्ह्यात सुपर स्पेशालिटीतील जिल्हा कोविड रुग्णालय हे एकमेव शासकीय रुग्णालय आहे. येथे ४५० बेडची सुविधा आहे. यात आयसीयूमध्ये ८३ बेड असताना ६४ बेड रुग्णांनी व्यापले आहे. याशिवाय १४४ ऑक्सिजन बेडपैकी १४१ रुग्णांनी व्यापले आहे व यात बहुतांश रुग्ण नागपूर येथील असल्याने जिल्ह्यातील गंभीर रुग्णांनी जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
कोट
जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात नागपूरचे १५० वर रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. या सर्व रुग्णालयांनी २५ टक्के बेड जिल्ह्यातील रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
- शैलेश नवाल,
जिल्हाधिकारी