आयसीयू, ऑक्सिजन बेडची मारामार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 05:00 AM2021-04-13T05:00:00+5:302021-04-13T05:00:52+5:30

जिल्ह्यात दररोज ४०० ते ५०० कोरोनाग्रस्तांची नोंद अलीकडे होत आहे, यात सध्या ८ ते १२ टक्के व फेब्रुवारी व मार्च महिन्यात सरासरी ३० ते ४० टक्के या प्रमाणात पॉझिटिव्हिटीची नोंद झाली होती. आता कोरोनाग्रस्तांचा ग्राफ काहीसा माघारला आहे. मात्र, लगतच्या नागपूर, अकोला, वाशिम, बुलडाणा, वर्धा जिल्ह्यात संसर्ग वाढला आहे. नागपूर जिल्ह्यात नवे कोरोनाग्रस्त व संक्रमितांचे मृत्यू यांचे रोज नवे उच्चांक स्थापन होत आहेत.

ICU, oxygen bed fights! | आयसीयू, ऑक्सिजन बेडची मारामार!

आयसीयू, ऑक्सिजन बेडची मारामार!

Next
ठळक मुद्देनागपूरसह अन्य जिल्ह्यांंतील रुग्ण दाखल जीव वाचणे महत्त्वाचे, प्रशासनाची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लगतच्या सर्व जिल्ह्यांत कोरोनाचा उद्रेक वाढल्याने तेथील रुग्ण अमरावती जिल्ह्यात उपचारार्थ दाखल होत आहेत.  जीव वाचणे महत्त्वाचा, अशी प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक शासकीय व २३ खासगी कोविड हॉस्पिटलचे आयसीयूचे ८२ टक्के व ऑक्सिजनचे ६७ टक्के बेड व्याप्त आहेत. अशीच स्थिती राहिल्यास एक-दोन दिवसांत आयसीयू व ऑक्सिजन बेडचा तुटवडा जाणवेल. 
जिल्ह्यात दररोज ४०० ते ५०० कोरोनाग्रस्तांची नोंद अलीकडे होत आहे, यात सध्या ८ ते १२ टक्के व फेब्रुवारी व मार्च महिन्यात सरासरी ३० ते ४० टक्के या प्रमाणात पॉझिटिव्हिटीची नोंद झाली होती. आता कोरोनाग्रस्तांचा ग्राफ काहीसा माघारला आहे. मात्र, लगतच्या नागपूर, अकोला, वाशिम, बुलडाणा, वर्धा जिल्ह्यात संसर्ग वाढला आहे. नागपूर जिल्ह्यात नवे कोरोनाग्रस्त व संक्रमितांचे मृत्यू यांचे रोज नवे उच्चांक स्थापन होत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरच आव्हान उभे ठाकले आहे. तात्काळ आरोग्य सेवा मिळणे महत्त्वाचे असल्याने रुग्णांसह नातेवाइकांची धाव अमरावती जिल्ह्याकडे आहे. त्यामुळे आठवडाभरापूर्वी शहरात ओस पडलेले कोविड हॉस्पिटल सध्या हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र आहे.
नागपूर व अन्य जिल्ह्यांतील कोरोनाग्रस्त जिल्ह्यात उपचारार्थ झाल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. याशिवाय काही प्रमाणात औषधांचाही तुटवडा निर्माण होत आहे. यात खासगी रुग्णालयात ऑक्सिजन व रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण होत आहे. अन्य जिल्ह्यातल्या रुग्णांनी येथील आयसीयू व ऑक्सिजन बेड व्यापले असताना जिल्ह्यात संसर्ग वाढल्यास येथील रुग्णांनी कोठे जावे, हा प्रश्न विचारला जात आहे.
 

१० रुग्णालयांत आयसीयू हाऊसफुल्ल
जिल्ह्यात २३ खासगी व एक शासकीय कोविड रुग्णालय आहे. यापैकी १० खासगी रुग्णालयांतील १२९ आयसीयू बेड हाउसफुल्ल स्थिती आहे. याशिवाय पाच रुग्णालयांत फक्त प्रत्येकी एक व एका हॉस्पिटलमध्ये दोन बेड रिक्त आहेत. या सर्व  रुग्णालयांमध्ये ४०९ आयसीयू बेड संख्या असताना ३३१ बेड व्याप्त झाल्यामुळे केवळ ७५ आयसीयू बेड शिल्लक आहेत.

सहा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड फुल्ल
शहरातील सहा रुग्णालयांतील ६२ ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्याप्त असल्याने येथेही हाऊसफुल्लची स्थिती उद्भवली आहे. एकूण २४ रुग्णालयांत ६६९ ऑक्सिजन बेडची उपलब्धता आहेत. यापैकी सद्यस्थितीत २२५ शिल्लक आहेत. यामध्ये पीडीएमएमसीमधील ५८ बेडचा समावेश आहे.

जिल्ह्यातील गंभीर रुग्णांनी जायचे कुठे?
जिल्ह्यात सुपर स्पेशालिटीतील जिल्हा कोविड रुग्णालय हे एकमेव शासकीय रुग्णालय आहे. येथे ४५० बेडची सुविधा आहे. यात आयसीयूमधील ८३ पैकी ६४  बेड रुग्णांनी व्यापले. याशिवाय १४४ ऑक्सिजन बेडपैकी १४१ रुग्णांनी व्यापले आहेत. यात बहुतांश रुग्ण नागपूर येथील असल्याने जिल्ह्यातील गंभीर रुग्णांनी जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागपूरच्या रुग्णांनी अर्धेअधिक रुग्णालय व्यापले
नागपूर जिल्ह्यात कोरोना विस्फोट झाल्याने तेथे बेड कमी पडत आहेत. त्यामुळे तेथील ५० हून अधिक रुग्ण येथील शासकीय कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. याशिवाय २३ खासगी रुग्णालयातील अर्धेअधिक बेड सध्या नागपूरच्या रुग्णांनी व्यापले. वर्धा, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ तसेच मध्यप्रदेशातील रुग्ण अमरावती शहरात उपचार घेत आहेत.

जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांत नागपूरचे १५० वर रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. रुग्णालयांना २५ टक्के बेड जिल्ह्यातील रुग्णांसाठी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
 - शैलेश नवाल
 जिल्हाधिकारी

 

Web Title: ICU, oxygen bed fights!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.