चांदूरबाजार तालुक्यातील निमखेड ठरले आदर्श गाव
By admin | Published: August 30, 2015 12:12 AM2015-08-30T00:12:23+5:302015-08-30T00:12:23+5:30
ग्रामपंचायतीत सर्व सदस्यांना अविरोध निवडून देणारे व सरपंच देखील अविरोध निवडून देणारे गाव हे लोकशाहीचे खरे आदर्श ठरले आहे.
सुमित हरकुट चांदूरबाजार
ग्रामपंचायतीत सर्व सदस्यांना अविरोध निवडून देणारे व सरपंच देखील अविरोध निवडून देणारे गाव हे लोकशाहीचे खरे आदर्श ठरले आहे. लोकशाहीचा पाया मजबूत करणाऱ्या अशा गावांचा शासनाने पुरस्काराने सन्मान करावा. यामुळे हा आदर्श एक लोकचळवळ घेऊन लोकशाही मजबूत करणारे एक पाऊल ठरेल.
शासनातर्फे विविध योजनेंतर्गत चांगले काम करणाऱ्या गावाचे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. त्यात आदर्श गाव, स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव, तंटामुक्ती पुरस्कार यासारख्या अनके पुरस्कार आहेत. योजनेंतर्गत चांगले काम करणाऱ्या गावांना पुरस्कार देण्यात येतो. गावातील मतभेद विसरून जातीपातीचा विचार न करता संपूर्ण गाव एकमताने ग्रामपंचायत सदस्य व सरपंच निवडून देतात, असे गाव खऱ्या अर्थाने आदर्श गाव ठरतात. अशा गावांमध्ये शासनाच्या प्रत्येक योजनेला व विकासाच्या कामाला परिपूर्ण न्याय दिला जातो. असेच एक गाव चांदूरबाजार तालुक्यातील निमखेड हे आहे. या गावाची लोकसंख्या १०५० इतकी असून त्यात हिंदू, मुस्लिम, बौद्ध तसेच इतर समाजाचे नागरिक राहतात. सर्वांचा व्यवसाय हा शेती तसेच मजुरी आहे. मागील निवडणुकीत या गावात सर्व ग्रामपंचायत सदस्य अविरोध निवडून आले होते व या निवडणुकीत देखील सर्व सदस्य अविरोध निवडून आले आहे व सरपंचदेखील मुस्लिम समाजाच्या नागरिकाला सर्व सदस्यांनी एकमताने केले आहे.
तालुक्यातील हे गाव धुरविरहीत चुलीचे पहले गाव ठरले आहे. या गावात वृक्षारोपण, स्वच्छालय, पथदिवे, स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव यासारख्या अनेक योजनांमध्ये अग्रेसर ठरलेले आहेत.
पूर्वी आपल्या देशात नगर राज्य होते. या नगर राज्यामध्ये नगरातील सर्व नागरिक मिळून आपला प्रमुख निवडत होते व सर्व संमतीने नगराचा विकास व नगराच्या समस्या सोडविल्या जात होत्या. खऱ्या अर्थाने त्याकाळी लोकशाहीच नांदत होती. पण आता लोकशाहीच्या निवडणुकीमुळे गावात राजकारण शिरून गावातील वातावरण गढूळ होऊन जातीपातीच्या राजकारणामुळे गावांची विभागणी झाली आहे. पण सद्यस्थितीत लोकशाही मजबूत करण्यासाठी जे गाव एकत्र येऊून सर्व सदस्यांसह सरपंचसुद्धा अविरोध निवडून देतात, अशा गावांचा शासनाने पुरस्कार करावा तरच खऱ्या अर्थाने ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे आदर्श गाव निर्माण होईल.