गुन्हेगारी हाताने साकारल्या लक्ष्मीच्या मूर्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 09:42 PM2018-11-02T21:42:14+5:302018-11-02T21:42:37+5:30
दिवाळी उत्सवाचे भारतीय संस्कृतीत अन्यय साधारण महत्व आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच अमरावती मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी सुबक आणि आर्कषक लक्ष्मीच्या मुर्त्या साकारल्या आहेत. या मुर्ती विक्रीसाठी शासकीय दराने उपलब्ध असणार आहे. मूर्ती विक्रीच्या उत्पन्नातून कैद्यांना रोजगार मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दिवाळी उत्सवाचे भारतीय संस्कृतीत अन्यय साधारण महत्व आहे. मात्र, यंदा पहिल्यांदाच अमरावती मध्यवर्ती कारागृहातील बंदी बांधवांनी सुबक आणि आर्कषक लक्ष्मीच्या मुर्त्या साकारल्या आहेत. या मुर्ती विक्रीसाठी शासकीय दराने उपलब्ध असणार आहे. मूर्ती विक्रीच्या उत्पन्नातून कैद्यांना रोजगार मिळणार आहे.
कारागृहात बंदीजनांसाठी सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत विविध उपक्रम, साहित्य निर्मिती आणि शिबिरांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार यावर्षी दिवाळीचे औचित्य साधून बंदीजनांच्या कलाकुसरीला वाव मिळावा, यासाठी लक्ष्मी मूर्ती तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. आॅक्टोबर महिन्यात मूर्ती साकारण्याचे नियोजन कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी केले. विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या बंद्यामधून कलावंत, चित्रकार, कलागुण असलेल्यांची लक्ष्मी मूर्ती तयार करण्यासाठी जबाबदारी सोपविण्यात आली. शाडू मातीच्या पर्यावरण पूरक मूर्ती साकारण्याला कारागृह प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.
यापूर्वी याच बंद्यांनी गणेशोत्सवात सुबक आणि आर्कषक गणेश मुर्त्या साकारल्या होता. पिढीजात मुर्तिकारांच्या कलाकुसरीला लाजवेल अशा लक्ष्मीच्या मुर्त्या बंदीजनांनी साकारल्या आहेत. या कैद्यांची गुन्हेगारी हात म्हणून समाजात आजही ओळख असली तरी याच हाताने लक्ष्मी मूर्ती साकारुन समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे.
आता हे हात गुन्हेगारी नव्हे तर समाजासाठी काही देणं लागते असा बदल त्यांच्या शिक्षेच्या काळात झाल्याचे चित्र अनुभवता येत आहे. १५० ते २०० लक्ष्मी मुर्त्या विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. प्रति मूूर्ती २०० ते ३०० रूपयांपर्यंत विकल्या जाईल.
अमरावती मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांच्या हातून तयार झालेल्या विविध वस्तू, साहित्य आणि फर्निचर विक्रीचे स्टॉल लागणार आहे. चांदूररेल्वे मार्गालगतच्या खुल्या प्रागंणात स्टॉल लावण्यात येणार अशी असल्याची माहिती कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी दिली.