जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित न झाल्यास रस्त्यावर उतरू
By admin | Published: December 3, 2015 12:18 AM2015-12-03T00:18:44+5:302015-12-03T00:18:44+5:30
अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट आणि चुकीची आणेवारी यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली असून ....
इशारा : युवक काँग्रेसचा सरकारला अल्टिमेटम
नांदगाव पेठ : अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट आणि चुकीची आणेवारी यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली असून आता सहनशीलतेचा अंत न पाहता शासनाने अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित न केल्यास सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा युवक काँग्रेसने तिवसा विधानसभा अध्यक्ष हरीष मोरे यांनी दिला आहे.
दिवसेंदिवस शेतकऱ्यांची परिस्थिती खालावत चालली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाणही कमी होते. स्वत:च्या मेहनतीने तोंडापर्यंत आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. कर्जाचे ओझे वाढत चालले असून शेतकऱ्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा व लग्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोनवेळचे जेवणही यावर्षी शेतीतून मिळणे कठीण झाले असताना सरकारने चुकीच्या पध्दतीने आणेवारी मांडणे म्हणजे शेतकऱ्यांच्या गळ्याभोवतीचा फास घट्ट करण्यासारखे आहे. शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आत्महत्येचा पर्याय शिल्लक ठेवला असून बळीराजाला जीवनदान देणे कर्तव्य असल्याचे हरीश मोरे यानी सांगितले.
युवक काँग्रेस ही शेतकऱ्यांच्या बाजूने असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आता संघर्ष करण्यासाठी वेळ आली आहे. आता शेतकऱ्यांचा संयम संपला असून शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने जर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हरीश मोरे यांनी दिला आहे. (वार्ताहर)