जंगले वाचली तर ओझोन वाचेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:17 AM2021-09-15T04:17:03+5:302021-09-15T04:17:03+5:30
अमरावती : संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (यू.एन.) पर्यावरण कार्यक्रम विभागातर्फे १९९५ सालापासून दरवर्षी १६ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा केला ...
अमरावती : संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (यू.एन.) पर्यावरण कार्यक्रम विभागातर्फे १९९५ सालापासून दरवर्षी १६ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा केला जातो. ओझोन थराच्या संरक्षणासाठी १९८७ साली कॅनडातील माॅन्ट्रिएन शहरात जगभरातील प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या. हा करार होता ओझोनच्या थरास हानिकारक ठरणाऱ्या पदार्थाचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा.
ओझोन हा वातावरणामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारा एक वायू आहे. ओझोनच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असल्यामुळे ओझोनचे रासायनिक सूत्र ओ -३ असे लिहितात. क्रिस्टियन फ्रेडरिक स्कोएनबेल या जर्मन स्वीच वैज्ञानिकाने १८४० साली ओझोनचा शोध लावला. पृथ्वीच्या वातावरणात रोज ३०० मिलियन टन ओझोन तयार होतो. पृथ्वीपासून २० ते २५ कि.मी. अंतरावर ओझोनचा थर असतो. ओझोनला कमी करणारा मुख्य गॅस क्लोरोफ्लोरो कार्बन हा होय. या गॅसचा उपयोग शीतकरण प्रक्रियेमध्ये केला जातो. अतिनील किरणापासून पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करणे हे ओझोनचे मुख्य काम आहे.
नासाच्या वैज्ञानिकाच्या मते वातावरणातील ओझोन वायू नष्ट करणाऱ्या पदार्थाचा पृथ्वीवर इतका प्रयोग वाढत चाललेला आहे की, काही दशकांंतच वातावरणातील ओझोन वायूचा थर ४० ते ५० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. मागील दोन दशकांंत ओझोनचा थर २ ते ३ टक्क्यांनी कमी झालेला आहे.
ओझोन थराचे संरक्षण करायचे असेल तर प्रदूषणाला आळा घालण्यासह जंगलाखालची भूमी सध्याच्या ३ ते ५ वाढविणे गरजेचे आहे. वृक्षलागवड करणे, सी.एफ.सी.सारख्या हानिकारक वायूचे नियमन करणे, वाहनातून निघणाऱ्या धुराचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे यांंसारख्या उपाययोजना करणे जरुरी आहे. पृथ्वीच्या पर्यावरणाला हानी पोहोचवण्यामध्ये मानवी घटक सहभागी असल्याची जाणीवही हा दिवस आपल्याला करुन देतो, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हाैशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.