हेल्मेट सक्ती मोडल्यास समुपदेशनाचा बडगा!
By admin | Published: January 17, 2016 12:09 AM2016-01-17T00:09:00+5:302016-01-17T00:09:00+5:30
हेल्मेटसक्तीचे आदेश डावलून नियम भंग करणाऱ्याला यापुढे कमीत कमी दोन तास समुपदेशन सत्राला उपस्थित राहावे लागणार आहे.
कोण वापरतं हेल्मेट? : शासन निर्णय कागदावरच, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई
प्रदीप भाकरे अमरावती
हेल्मेटसक्तीचे आदेश डावलून नियम भंग करणाऱ्याला यापुढे कमीत कमी दोन तास समुपदेशन सत्राला उपस्थित राहावे लागणार आहे. रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमिवर गृह विभागाने हेल्मेट व अन्य नियमांची उजळणी करणारा शासन आदेश पारित केला आहे. मात्र हेल्मेट वापरतं कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हेल्मेटबाबतचे नियम वाहन चालविणारी व्यक्ती तसेच मागे बसलेल्या व्यक्तींसाठी राज्यभर लागू असतील, असे या आदेशात नमूद असले तरी शहर आयुक्तालय किंवा जिल्ह्यात कुठेही या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शासन निर्देशाला प्रशासनच कशा ‘वाकुल्या’ दाखवते हे या नव्या निर्णयाने स्पष्ट झाले आहे.
१७ डिसेंबर २०१५ परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा परिषदेची बैठक नागपूर येथे पार पडली. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश विचारात घेवून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्याबाबत शासन निर्णयही प्रसुत करण्यात आला. यात विविध ६ नियमभंग केल्यास ३ महिने वाहन परवाना निलंबित करण्याचे आदेश यात आहेत.
वाहन चालविणाऱ्या किंवा मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेटबाबतच्या नियमांचा भंग केल्यास सदर नियमांतर्गत तडजोड शुल्क वसूल करण्यापूर्वी सदर नियमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीस कमीत कमी २ तास कालावधीच्या रस्ता सुरक्षा विषयक नियमांच्या समुपदेशनासाठी उपस्थित राहावे लागेल. रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमिवर निघालेल्या या आदेशाच्या अंमलबजावणीकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.
मद्यपींची खैर नाही; भोगावा लागणार कारावास
दारू पिवून किंवा अंमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविणे या गुन्ह्यासाठी पोलीस विभाग वाहन परवाना निलंबित करण्याव्यतिरिक्त खटला दाखल करु शकतात. तसेच मोटर वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८५ नुसार न्यायालयाकडे अगदी पहिल्या गुन्ह्यासाठी आरोपीच्या कैदेची मागणी करावी, अशा स्पष्ट सूचना शासनादेशातून पोलीस विभागाला देण्यात आल्या आहेत.
या नियमभंगावर होईल कारवाई
विहित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे
लाल सिग्नल ओलांडून जाणे.
मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे.
मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे.
दारू पिवून/अंमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविणे.
वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे हा नियमभंग केल्यास किमान तीन महिने परवाना निलंबित करण्याचे ‘पॉवर’ पोलिसांना आहेत.
-तर तीन महिने वाहन
परवाना निलंबित
मोटारवाहन अधिनियम, १९८८ कलम १९, ९ केंद्रीय वाहन नियम १९८९ च्या नियम २१ नुसार ६ गुन्ह्याकरिता वाहन चालकांचा परवाना किमान तीन महिने निलंबित करण्याच्या सूचना राज्याच्या गृह विभागाने दिल्या आहेत. तथापी झंझट नको म्हणून वाहतूक विभाग त्याकडे फारसा लक्ष देत नाही.
अंमलबजावणी
करणारेही हेल्मेटविनाच
हेल्मेटविना वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर आहे. तथापि एखादा अपवाद वगळता बहुतांश वाहतूक पोलीस हेल्मेटविनाच वावरताच तत्कालीन पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांनी किमान पोलीस आयुक्तालय कार्यालयात पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरणे बंधनकारक केले होते. मात्र त्यानंतर पहिले पाढे पंचावन्न!