वीजवापर शून्य ते 30 युनिट असेल तर सावधान, होऊ शकते तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 05:00 AM2021-11-01T05:00:00+5:302021-11-01T05:00:56+5:30
सर्वाधिक वीजचोरी औद्योगिक ग्राहक करीत असल्याचे अलीकडे महावितरणने जारी केलेल्या आकडेवाडीतून दिसून आले. गत महिन्यात ९० लाखांची वीजचोरी पकडली असून, ४०० वीजचोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. घरगुती, ग्राहकही वीजचोरीत मागे नसून अत्याधुनिक किटचा वापर करून वीजचोरी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
संदीप मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महिन्याला ० ते ३० युनिट वीज वापरणाऱ्या मीटरची तपासणी महावितरणतर्फे अनेक ठिकाणी केली जात आहे. ० ते ३० युनिटपर्यंत विद्युत ग्राहकांचा वापर असेल तर असे ग्राहक संशयाच्या भोवऱ्यात अडकणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. अशा वीजग्राहकांची तपासणी करून दोषी आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
मीटरमध्ये फेरफार, इलेक्ट्रिॉनिक्स चिप्स वा रिमोटच्या माध्यमातून मीटर गती मंद केली जात असल्याचे प्रकार अलीकडे पुढे आले आहे. वीजबिलाच्या वसुलीसह वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवरसुद्धा वीज विभागाचे लक्ष असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दररोज लाखाेची वीजचोरी
सर्वाधिक वीजचोरी औद्योगिक ग्राहक करीत असल्याचे अलीकडे महावितरणने जारी केलेल्या आकडेवाडीतून दिसून आले. गत महिन्यात ९० लाखांची वीजचोरी पकडली असून, ४०० वीजचोरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. घरगुती, ग्राहकही वीजचोरीत मागे नसून अत्याधुनिक किटचा वापर करून वीजचोरी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
दिवाळी आधीच सात हजार नागरिकांच्या घरात अंधार
कृषीग्राहक सोडून घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वीज ग्राहकांकडे कोट्यवधींची थकबाकी आहे. महावितरणच्या पथकाला या महिन्यात १६० कोटी वीजबिल थकबाकी करण्याचे आदेश होते. त्याकरिता पथक कामाला लागले आहे. मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता रस्त्यावर उतरून वीजग्राहकांना आव्हान करून वीजबिल भरण्यास सांगत आहेत. कोळसा टंचाईमुळे विजेची निर्मिती अडचणीत आली असताना वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी रोज शेकडो ग्राहकांची वीज कापली जात आहे. जिल्ह्यात या महिन्यात सात हजार लोकांची वीज कापण्यात आली. त्यांनी पैशे भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत केला जात आहे. त्यामुळे हजारो घरगुती ग्राहकांची घरात दिवाळीपूर्वीच अंधार झाला आहे.
जिल्ह्यातील वीज ग्राहक
शून्य ते ३० युनिटपर्यंतच वीज ग्राहकांचा वापर असेल अशा मीटरची तपासणी करतो. आतापर्यंंत १२ हजार मीटरची जिल्ह्यात तपासणी केली. सध्या थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांची वीज कापली जात आहे. ग्राहकांनी आम्हाला समजून घेऊन विद्युत बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे.
- दिलीप खानंदे, अधीक्षक अभियंता