-तर राहुलचा मृतदेहच हाती लागला असता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:11 AM2017-11-29T00:11:21+5:302017-11-29T00:12:14+5:30
प्रतीक्षाच्या हत्येनंतर विष प्राशन केलेल्या अवस्थेत राहुल भड मूर्तिजापुरातील रेल्वे रुळावर भटकत होता.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : प्रतीक्षाच्या हत्येनंतर विष प्राशन केलेल्या अवस्थेत राहुल भड मूर्तिजापुरातील रेल्वे रुळावर भटकत होता. रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या राहुलला राजापेठ पोलिसांनी वेळीच अटक केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. अन्यथा पोलिसांच्या हाती केवळ राहुलचा मृतदेहच लागला असता. पोलिसांच्या गतिमान कारवाईचे हे उदाहरण आहे.
वृंदावन कॉलनीतील ओंकार मंदिरातून प्रतीक्षा मेहेत्रे व तिची मैत्रीण श्वेता दुचाने घरी जात होत्या. त्यावेळी राहुल प्रतीक्षाचा पाठलाग करीत असताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दोघांची वाहने सोबत चालत असताना प्रतीक्षा व राहुल चालत्या वाहनावरच संभाषण करीत होते. वृंदावन कॉलनीच्या घटनास्थळापासून पुढे ५०० मीटर अंतरापर्यंत दोघेही बोलत होते. दरम्यान ते काही अंतरावर थांबले नि तेथून घटनास्थळावर परतले. तेथे राहुल व प्रतीक्षा बोलत असताना श्वेता थोड्या अंतरावर उभी होती. अचानक राहुलने बॅगमधील चाकू काढून प्रतीक्षावर वार केला व तेथून निघून गेला. पत्नी प्रतीक्षाला केवळ वेदना देण्याच्या बेतात असलेल्या राहुलने प्रतीक्षाला जीवानिशीच ठार केले. श्वेता ही मदतीसाठी आर्त हाक देत होती. प्रतीक्षा बेशुद्ध झाल्याचे पाहून राहूलनेही तेथून पळ काढला. प्रतीक्षाला ठार केल्याचा पश्चातापाने राहुलही मानसिक तणावात होता. कोठे जावे, काय करावे, या चिंतेत राहूलने दुचाकीने थेट दारव्हा रोड गाठला. मात्र, कुठेही गेले तरी पोलीस पकडतील, हे त्याला ज्ञात होते. आता प्रतीक्षा तर गेली, मग आपणही जगून काय करायचे, असा प्रश्न राहुलला पडला. त्याने मूर्तिजापूर गाठून एका कृषी केंद्रातून विषारी औषध विकत घेऊन पाण्यासोबत ग्रहण केले. विषाचा प्रभाव सुरू झाल्यावर तो नशेत होता. मृत्यूची तो प्रतीक्षा करीत होता. मात्र, विषाचा फारसा प्रभाव राहुलवर झाला नाही. त्यामुळे तोे रेल्वे रुळावर फिरून रेल्वेची प्रतीक्षा करीत होता. राजापेठ पोलीस पथक राहुलचा मागोवाच घेत होते. दरम्यान पोलिसांनी राहुलला भावासोबत वाहनात घेतले. त्याचे लोकेशन घेण्याचा प्रयत्न सुरूच होता. दरम्यान राहुलच्या भावाचा फोन वाजला आणि तो फोन राहूलचाच होता. राहुलला बोलते ठेवण्याच्या सूचना पोलिसांनी त्याच्या भावाला दिल्या होत्या. त्याने राहुलला समजून सांगण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. यावेळी पोलीसही मूर्तिजापूरला पोहोचले होते. जसे पोलिसांना राहुलचे लोकेशन मिळाले, तसेच पोलिसांनी रेल्वे रुळाकडे धाव घेतली आणि राहुलला ताब्यात घेतले. त्यामुळे या कारवाईस थोडाही विलंब झाला असता तर पोलिसांच्या हाती केवळ राहुलचा मृतदेहच हाती लागला असता, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
नोटरी करणाऱ्या वकिलाचे बयाण नोंदविले
राहुलने ज्या चाकूने प्रतीक्षाची हत्या केली तो चाकू बडनेरा मार्गावर फेकला होता. मात्र, त्याला चाकू फेकल्याचे निश्चिच स्थळ लक्षात येत नव्हते. राजापेठ पोलिसांनी राहुलला बडनेरा मार्गावर फिरून चाकू फेकण्याच्या ठिकाणाची शहानिशा करून चाकू जप्त केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी विवाह लावून देणाऱ्या पुरोहीतांचे व नोटरी करून देणाऱ्या वकीलाचे बयाण नोंदविले आहे.
हत्याप्रकरणातील आरोपी राहुल भड हा मूर्तिजापूर रेल्वे रुळावर भटकताना आढळला. त्याला वेळीत ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला, अन्यथा रेल्वे आली असती तर त्याचा केवळ मृतदेहच हाती लागला असता.
- किशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक