अफवा पसरवाल तर होईल कायदेशीर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 11:34 PM2018-07-02T23:34:09+5:302018-07-02T23:35:35+5:30
लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याच्या अफवेला राज्यभरात पेव फुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ही केवळ अफवा असल्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर यांच्यासह पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी स्पष्ट केले. अशा अफवा पसरविणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. संशयित दिसल्यास कायदा हाती न घेता तत्काळ पोलिसांना कळवा, असेही आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याच्या अफवेला राज्यभरात पेव फुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ही केवळ अफवा असल्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर यांच्यासह पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी स्पष्ट केले. अशा अफवा पसरविणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. संशयित दिसल्यास कायदा हाती न घेता तत्काळ पोलिसांना कळवा, असेही आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.
जिल्ह्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याची अफवा समाजकंटकांनी पसरविली आहे. राज्यात काही ठिकाणी अशा अफवेने निरपराधांवर हल्ले होऊन जीव गेल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. शहरातील वलगावात अशाप्रकारच्या अफवेला पेव फुटला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अफवा समाजातील काही समाजकंटक जाणीवपूर्वक पसरवून शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आली असून, जनतेने अशा अफवांना बळी न पडता त्यातील सत्यता पडताळून पाहणे गरजेचे झाले आहे. प्रसंगी शंका आल्यास कायदा हातात न घेता त्वरित संबंधित पोलीस ठाणे, गावातील पोलीस पाटील, पोलीस मित्र, प्रतिष्ठित व सुजाण नागरिकांना सुचित करावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे. अफवा पसरविणाºयांची शोधमोहीम पोलिसांनी हाती घेतली असून, त्या अनुषंगाने पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.
शंका आल्यास इथे फोन करा
सोशल मीडियावर अशाप्रकारच्या अफवेचे संदेश व्हायरल केले जात असून, असे संदेश पाठविणे किंवा फॉरवर्ड करणे गु्न्हा ठरू शकतो. अशा अफवा पसरविणाºयांचा शोध पोलिसांनी चालविला असून, संदेश पाठविणाºयाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली. कोणत्याही व्यक्तीवर संशय आल्यास नागरिकांनी कायदा हाती न घेता पोलीस विभागाच्या १०० किंवा ०७२१-२५५१००० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अफवेची भीती बाळगू नका
भीती वाटणे मानवी स्वभावच आहे. सत्य घटना असो की अफवा असो सर्वसामान्य नागरिक घाबरून जातात. मात्र, विनाकरण घाबरणे योग्य नाही. त्याचा परिणाम होणेही साहजिक आहे. अफवेला आधार नसतो. त्यामुळे आपले दैनंदिन जीवन विस्कळीत होऊ देऊ नका, आपल्या मनातील शंका किंवा भीती दूर करण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क करा. इर्विनमधील मानसिक उपचार विभागाशी संपर्क केल्यास समुपदेशनातून मनातील शंका किंवा भीती दूर करण्यात येईल, अशी माहिती मनोचिकित्सक अमोल गुल्हाने यांनी दिली.