-तर आत्मदहन करू, काँग्रेस नेत्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:45 PM2018-05-29T22:45:57+5:302018-05-29T22:46:11+5:30

-If self-sacrifice, Congress leaders' hint | -तर आत्मदहन करू, काँग्रेस नेत्यांचा इशारा

-तर आत्मदहन करू, काँग्रेस नेत्यांचा इशारा

Next
ठळक मुद्देमूक मोर्चा : बबलू देशमुख, यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, केवलराम काळे, संजय खोडके, नरेशचंद्र ठाकरे यांचे नेतृत्व

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही तूर खरेदीचे पैसे मिळाले नाहीत. गोदाम नसल्याचे कारण पुढे करून तूर व हरभऱ्याचे मोजमाप केले नाही. बाजार समिती आणि खरेदी-विक्री संघाच्या आवारात खरेदी केलेली तूर पडून आहे. बोंडअळी नुकसानभरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. कर्जमाफीचा बोजवारा उडाला आहे. याला केंद्र व राज्यातील भाजप सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच मागण्या ३१ मेपर्यंत सोडविण्यात याव्या, अन्यथा जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते १ जून रोजी आत्मदहन करतील, असा निर्वाणीचा इशारा मंगळवारी आ. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, प्रदेश सचिव संजय खोडके, माजी आमदार केवलराम काळे, नरेशचंद्र ठाकरे, झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती जयंत देशमुख आदींनी दिला.
केंद्रातील शेतकरीविरोधी भाजप सरकारच्या खोट्या आश्वासनांचा निषेध म्हणून जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने मंगळवारी मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तोंडाला आणि हाताला काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे महागले आहे. शेतमालाला भाव नाही. कर्जमाफी ही कागदोपत्रीच झाली. तूर विकली, पण शेतकºयांना पैसे मिळाले नाहीत. पीक विम्याचा लाभही नाही. गोदाम उपलब्ध नसल्याचे सांगत तूर व हरभरा खरेदी रखडली आहे. सर्व शेतमाल खरीप हंगामापूर्वी खरेदी करावा व चुकारे त्वरित मिळावे आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्थानिक काँग्रेसचे नेते आत्मदहन करतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला दिला.
दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी तुरीचे चुकारे त्वरित देण्यात येतील, तूर व हरभरा खरेदी पूर्ण केली जाईल, तुरीची उचल करण्यासाठी गोडावून उपलब्ध होतील, बारदाना कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली. आंदोलनात जि.प. सभापती बळवंत वानखडे, वनिता पाल, सतीश हाडोळे, गिरीश कराळे, श्याम देशमुख, दयाराम काळे, प्रकाश काळबांडे, संजय मार्डीकर, भागवत खांडे, बिट्टू मंगरोळे, बापूराव गायकवाड, प्रवीण घुईखेडकर, मोहन सिंगवी, नितीन दगडकर, हरिभाऊ मोहोड, प्रमोद दाळू, सुरेश आडे, प्रवीण वाघमारे, शिवाजी बंड, सुरेश साबळे, राहुल येवले, बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे, अनंत साबळे, गजानन राठोड, प्रदीप देशमुख, रावसाहेब लंगोटे, भैयासाहेब मेटकर, अभिजित देवके, छाया दंडाळे, अलका देशमुख, अनिता मेश्राम, जयश्री तळोकार आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
शेतकरी हवालदिल झाला -यशोमती ठाकूर
अ.भा. काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सचिव आ. यशोमती ठाकूर म्हणाल्या, एकही आश्वासन या सरकारने पूर्ण केले नाही. यांना गोदाम उपलब्ध करता आले नाहीत. काँग्रेसचे सरकार होते तेव्हा सारेच पैसे मिळत. पण, आता शेतकऱ्यांना घामाचे पैसेही मिळत नाहीत. खरीप जवळ आला असल्याने शेतकरी हवालदिल आहेत. फडणवीस सरकारने चार वर्षांत फक्त योजनांची नावे बदलली. सहकार क्षेत्र बर्बाद करण्याचा या सरकारचा अजेंडा आहे.
शेतकऱ्यांसह जनतेची फसवणूक -वीरेंद्र जगताप
केंद्र-राज्यातील मोदी-फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने शेतकºयांची मागील चार वर्षांपासून फसवणूकच केली आहे. शेतकºयांना दिलेल्या आश्वासनांपैकी एकाची पूर्तता केली नाही. कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही. शेतमाल पूर्णपणे खरेदी केला नसताना तूर व हरभरा खरेदी केंद्रे बंद करण्यात आली. शेतमालाचे चुकारेही दिले नाहीत. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जनहितविरोधी व शेतकरीविरोधी या सरकारचे दिवस भरलेत, असे आ. वीरेंद्र जगताप म्हणाले.
सरकारला जनताच धडा शिकवेल -बबलू देशमुख
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख म्हणाले की, या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांना न्याय देण्यात भाजप सरकार अपयशी ठरले. खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना तूर, बोंडअळीच्या नुकसानाचे पैसे देण्यात यावेत. नोटबंदी, जीएसटीमुळे देशाचा आर्थिक विकासदर खालावला. या निर्णयाचा सामान्य नागरिकांना त्रास झाला. चार वर्षांतच हे सरकार अपयशी ठरले. या विश्वासघातकी सरकारला आता जनताच धडा शिकविणार आहे.

Web Title: -If self-sacrifice, Congress leaders' hint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.