"चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेले श्रीसदस्य जिवंत होणार असतील तर हनुमान चालिसा म्हणेन"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 03:57 PM2023-08-16T15:57:19+5:302023-08-16T15:58:37+5:30
सुषमा अंधारे अमरावती दौऱ्यावर असताना आयोजित सभेत त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारला लक्ष्य केलंय
अमरावती - महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात हनुमान चालिसा पठण करण्यावरुन चांगलाच गदरोळ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री बंगल्यासमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर, शिवसैनिकांनी त्यांच्या मुंबईतील घराबाहेर गर्दी केली होती. त्यांच्या घरावर मोर्चा काढला होता. तेव्हापासून हनुमान चालिसा हा राष्ट्रीय मुद्दा बनल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चक्क सभागृहातच हनुमान चालिसा म्हणून दाखवली. आता, त्यावरुन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट अमरावतीतून प्रश्न उपस्थित केले आहेत.
सुषमा अंधारे अमरावती दौऱ्यावर असताना आयोजित सभेत त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारला लक्ष्य केलंय. यावेळी, हनुमान चालिसेच्या मुद्द्यावरुन नवनीत राणांनाही त्यांनी निशाणा बनवलं. ''सरकारला प्रश्न विचारले की आवडत नाही. सध्या कसं झालंय, मुस्लिमाने विरोधात बोललं की त्याला दहशतवादी ठरवायचं. दलितांनी विरोधात बोललं की त्याला नक्षलवादी ठरवायचं आणि इतरांनी विरोधात बोललं की त्याला देशद्रोही ठरवायंचं असं काम सुरू आहे. पण, आपण कधी प्रश्न विचारतोय का?'' असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
खासदार श्रीकांत शिंदेंनी लोकसभा सभागृहात हनुमान चालिसा म्हटली. पण, हनुमान चालिसा म्हटल्याने भारतातील किती प्रश्न सुटले?. हनुमान चालिसा म्हटल्याने श्री सदस्यांच्या चेंगराचेंगरीचा प्रश्न उपस्थित झाला नसता, ते सदस्य जर जिवंत होणार असतील तर मी दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळ हनुमान चालिसा म्हणायला तयार आहे. जर, हनुमान चालिसा म्हटल्याने समृद्धी महामार्गावरील २७ जीव परत येणार असतील, तर निश्चितपणे आम्ही श्रीकांत शिंदेंच्या हनुमान चालिसेच्या समर्थनार्थ आहोत, हनुमान चालिसा म्हटल्याने मणिपूरमध्ये जे घडलं ते रिव्हर्स करुन ओक्के आणि दुरुस्त होत असेल तर हनुमान चालिसेचं स्वागत करू. पण, कुठली गोष्ट तुम्ही कुठे नेताय? असा प्रश्नही सुषमा अंधारेंनी अमरावतीमधील सभेत विचारला.
जिथे लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न मांडायचे असतात, तिथे लोकांचे प्रश्नच मांडले जात नाहीत. त्यामुळे, या डोक्याने तुम्ही कधीतरी हा विचार कराल का? असा प्रश्नच अंधारे यांनी उपस्थितांना विचारला. तसेच, तिकडे हनुमान चालिसा म्हणण्यापेक्षा ठाण्यातील रुग्णालयात ४ दिवसांत २७ रुग्ण दगावले, त्यावर मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव का बोलत नाहीत, असेही अंधारे यांनी म्हटलं.