परीक्षेत दहा कॉपीबहाद्दर पकडल्यास ‘ते’ केंद्र रद्द होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:18 AM2019-03-01T11:18:45+5:302019-03-01T11:20:35+5:30
दहावी- बारावीच्या परीक्षेत वाढते गैरप्रकार रोखण्यासाठी एका पेपरला दहा कॉपीबहाद्दर पकडले गेल्यास ते परीक्षा कें द्र रद्द केले जाईल. सदर परीक्षा केंद्राची अनुदान कपात आणि मान्यतादेखील काढून घेतली जाणार आहे, असा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दहावी- बारावीच्या परीक्षेत वाढते गैरप्रकार रोखण्यासाठी एका पेपरला दहा कॉपीबहाद्दर पकडले गेल्यास ते परीक्षा कें द्र रद्द केले जाईल. सदर परीक्षा केंद्राची अनुदान कपात आणि मान्यतादेखील काढून घेतली जाणार आहे, असा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालये आणि शाळा संचालकांची भंबेरी उडाली आहे.
२१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कॉपी करण्याचे प्रमाण कमी असल्याचे आकडेवारीहून दिसून येते. शुक्रवार, १ मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहे. एकाचवेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाल्यामुळे परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकाचीदेखील परीक्षा ठरणार आहे. पेपरफुटीचे प्रकार घडल्यास कनिष्ठ महाविद्यालय, शाळांने अनुदान, मान्यतेवर परिणाम होणार आहे. कोणत्याही केंद्रावर पेपरफुटीचे आणि कॉपी करण्याचे प्रकार आढळल्यास त्याच केंद्राला दोषी ठरवावे, असा निर्णय समितीच्या शिफारशीनुसार घेण्यात आला आहे.
अशी होणार कारवाई
दहावी, बारावीच्या पेपरमध्ये कॉपी अथवा पेपरफुटीचे प्रकार निदर्शनास आल्यास केंद्र प्रमुख, केंद्र चालक जबाबदार राहतील. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. खासगी शाळा सेवाशर्ती अधिनियम १९९७ अंतर्गत वेतनवाढ रोखण्यात येईल. खालच्या पदावर आणण्याची कारवाई दोषी आढळल्यास करण्याची तरतूद आहे.
एकाच पेपरला किमान १० कॉपी बहाद्दर पकडण्यात आले तर त्या शाळेच्या केंद्र रद्द केले जाईल. पुढच्या टप्प्यात अनुदान कपात आणि शाळेची मान्यता काढली जाईल. कॉपीमुक्त अभियानासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरेल.
- शरद गोसावी,
अध्यक्ष, शिक्षण मंडळ, अमरावती.