शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर येऊ - आमदार रोहित पवार
By उज्वल भालेकर | Published: November 13, 2023 08:04 PM2023-11-13T20:04:05+5:302023-11-13T20:05:12+5:30
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास आम्ही आणि आमचे मित्र पक्षही रस्त्यावर येऊ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेतृत्व आमदार रोहित पवार यांनी सोमवारी अमरावतीमध्ये व्यक्त केली.
अमरावती: राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन कमी झाले असून खर्च वाढला आहे. परंतु सरकार मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. त्यामुळे दिवाळीनंतर प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी मोर्चा काढून सरकारला जाब विचारल्या शिवाय राहणार नाही.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास आम्ही आणि आमचे मित्र पक्षही रस्त्यावर येऊ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेतृत्व आमदार रोहित पवार यांनी सोमवारी अमरावतीमध्ये व्यक्त केली.
आमदार रोहित पवार हे विदर्भ दौऱ्यावर असून सोमवारी ते अमरावतीमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले जो पवार साहेबांचा दाखला सोशल मीडियावर बाहेर फिरत आहे तो खरा नाही. भाजपा नेहमीच खोट्या गोष्टी पसरवून त्याचे राजकारण करते. त्यांना असत्याचा मार्ग घेऊन सत्तेत येणे एवढाच काय ते समजते. आणि सत्तेत आल्यावर सत्तेचा दुरुपयोग करणे एवढंच भाजपला माहीत आहे. सामान्य लोकांचे प्रश्नांची मात्र त्यांना काहीही घेण देण नाही.
लोकसभेच्या आधी हिंदू मुस्लिम होत नाही म्हणून समजा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपा कडून केला जातो. मराठा आणि ओबीसी सोबतच हिंदू, मुस्लिम होण्याचा प्रयत्न केला जाईल समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपकडून केला जाईल असेही रोहित पवार यावेळी म्हणाले. अजित पवार व शरद पवार परत येतील की नाही तो त्यांचा दोघांचा प्रश्न आहे, मात्र अजित दादांच्या चेहऱ्याकडे पाहून ते नाराज आहे असं जाणवत असून भाजपला लोकनेता पटत नाही असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.