यादीत छायाचित्र नसल्यास वगळणार मतदाराचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:22 AM2020-12-03T04:22:58+5:302020-12-03T04:22:58+5:30
अमरावती : ज्या मतदाराचे नाव मतदार यादीत आहे मात्र, छायाचित्र नाही, त्यांनी विहीत मुदतीत छायाचित्र उपलब्ध न केल्यास त्यांची ...
अमरावती : ज्या मतदाराचे नाव मतदार यादीत आहे मात्र, छायाचित्र नाही, त्यांनी विहीत मुदतीत छायाचित्र उपलब्ध न केल्यास त्यांची नावे मतदार नोंदणी अधिकारी कमी करणार आहेत. तसे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे एनआयसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यासोबतच बीएलओकडेदेखील यादी देण्यात आलेली आहे. यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास मतदार यादीतून नावे वगळण्याची कार्यवाही केली जाणार आहे. याबाबत सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्षाद्वारे नियुक्त केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्यांना सूचना देण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
१ जानेवारीला ज्यांना वयाची १८ वर्षे पूर्ण होतील त्यांनी आपल्या नावाची नोंद करावी. याशिवाय जे मतदार कायमस्वरुपी स्थलांतरित झालेले आहेत, त्यांनी नमुना ७ भरून नावे वगळण्याची कार्यवाही करावी. मृत मतदाराच्या संदर्भातही नमुना ७ भरून नावे कमी करावी. ज्या मतदारांचे ओळखपत्र नाही, त्यांनी मतदार नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
बॉक्स
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत १५ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येतील. याशिवाय ५, ६, १२ व १३ डिसेंबरला विशेष मोहीम राहणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.