'ते' घर सुरक्षित ठेवू शकत नाही, तर मतदारसंघ कसा ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 01:24 PM2024-11-08T13:24:08+5:302024-11-08T13:25:12+5:30
Amravati : मोर्शीत भाजपचे उमेश यावलकर यांच्यावर प्रश्नचिन्ह; भाऊबंदकीचा वाद चव्हाट्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात एकमात्र महायुतीत मोर्शी मतदारसंघात भाजप आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांत मैत्रीपूर्ण लढत होत आहे. ही मैत्रीपूर्ण लढत भाजपचे चंदू यावलकर आणि अजित पवार गटाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यासाठी डोकेदुखी ठरणारी आहे.
त्यातच चंदू यावलकर यांचे मोठे बंधू संजय यावलकर हे 'तुतारी'च्या बाजूने उभे झाल्यामुळे भाजपचा हार्टबीट वाढलेला आहे. तर दुसरीकडे 'ते' घर सुरक्षित ठेवू शकत नाही, ते मोर्शी मतदारसंघ कसा सांभाळणार? अशी चर्चा आता मतदारांमध्ये रंगू लागली आहे.
भाजपचे उमेदवार चंदू यावलकर म्हणजे तोंडात साखर अशी त्यांची ओळख आहे. पण राजकीय स्वार्थासाठी ते कोणाचाही गेम करण्यासाठी मागेपुढे पाहत नाही, अशी त्यांची दुसरी बाजू आहे. गत काही वर्षापूर्वी मोर्शी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजू काळे यांचे आस्कमिक निधन झाले होते. त्यामुळे राजू काळे यांच्या रिक्त जागेवर त्यांच्या पत्नीला बिनविरोध निवडून आणण्याचा सर्वपक्षीय निर्णय त्यावेळी झाला होता. माळी समाजातून दुसरे कोणीही निवडणूक लढणार नाही, असे ठरले होते. मात्र चंदू यावलकर यांनी या सर्वपक्षीय निर्णयाला छेद देत स्वतः नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत राजू काळे यांच्या पत्नीला पराभवाला सामोरे जावे लागले आणि चंदू यावलकर हे विजयी झाले होते. चंदू यावलकर यांचा हा स्वार्थी डाव आजही मोर्शीकरांच्या हृदयावर घाव करून आहे. त्यामुळे 'आगे आगे देखो होता है क्या'? या प्रतीक्षेत मतदार आहे.
यावलकर बंधू म्हणजे 'दुश्मन न करें
चंदू यावलकर आणि संजय यावलकर हे दोघे भाऊ आहेत. मात्र या दोघांमध्ये अबोला असून विस्तवही जात नाही, अशी माहिती आहे. म्हणूनच संजय यावलकर यांनी तुतारी'च्या व्यासपीठावर हजेरी लावून मतदारांना 'मेसेज' दिला, है विशेष, संजय यावलकर यांनी यापूर्वी मोशींचे नगराध्यक्षपद भूषविले आहे. ते कट्टर शिवसैनिक आहे. संजय यावलकर यांनी यापूर्वी विधानसभेची निवडणूक शिवसेनेच्या बॅनरखाली लढवली होती. अवघ्या १३०० मतांनी संजय यावलकर यांचा पराभव झाला होता. त्यावेळी हर्षवर्धन देशमुख हे निवडून आले होते. आता लहान बंधू चंदू यावलकर भाजपचे उमेदवार असताना मात्र संजय यावलकर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच मोर्शी मतदारसंघात यावलकर बंधू म्हणजे दुश्मन न करे..., असे बोलले जात आहे.
मैत्रीपूर्ण लढतीत कोणाचा होणार 'गेम'?
मोर्शी मतदारसंघात महायुतीत भाजपचे चंदू यावलकर आणि अजित पवार गटाचे देवेंद्र भुयार हे दोन्ही उमेदवार आमने-सामने उभे ठाकले आहेत. भाजपा उमेदवारांच्या प्रचारातून राष्ट्रवादी अजित पवार यांचे चिन्ह आणि फोटो गायब तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या बॅनर पोस्टर वरून नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आहे. मात्र जाहीरनामा एकच, योजना एक परंतु प्रचार वेगळा अशी अवस्था आहे. विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यशैलीवर मतदारांची प्रचंड नाराजी आहे. एकंदरीत पक्षीय राजकारणाला जनता वैतागली असून यंदा मोर्शी विधानसभा निवडणुकीत कोणाचा गेम होणार हे २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे