केरकचरा बाहेर फेकल्यास ५ हजारांचा दंड
By admin | Published: May 30, 2017 12:05 AM2017-05-30T00:05:07+5:302017-05-30T00:05:07+5:30
शहर स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासन झटत असले तरी पुरेशा लोकसहभागाअभावी बहुतांश ठिकाणी स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.
व्यावसायिकांना तंबी : प्रसंगी फौजदारीही
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहर स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासन झटत असले तरी पुरेशा लोकसहभागाअभावी बहुतांश ठिकाणी स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. या पार्श्वभूमिवर दुकानातील कचरा बाहेर फेकणाऱ्यांकडून ५ हजार रूपये दंड आकारला जाणार आहे. संबंधित प्रतिष्ठानधारक कचरा घंटीकटल्यात न टाकता बाहेर फेकत असल्याचे वारंवार आढळून आल्यास त्यांचेविरूद्ध फौजदारी दाखल करण्याची तंबी आयुक्तांनी दिली आहे.
सकाळी ५ ते १० या कालावधीत शहराची दैनंदिन स्वच्छता केली जाते. मात्र, व्यावसायिकांची दुकाने सकाळी १० च्या पुढे उघडत असल्याने संबंधित प्रतिष्ठानधारक त्यांच्या दुकानातील कचरा इस्तत: फेकून देत असल्याचे निरीक्षण आयुक्तांनी नोंदविले आहे.
डस्टबिन अनिवार्य
अमरावती :त्याअनुषंगाने व्यावसायिकांनी आपापल्या प्रतिष्ठानांमध्ये ‘डस्टबिन’ ठेवाव्यात व त्या डस्टबिनमध्ये जमा करण्यात आलेला कचरा महापालिकेच्या घंटीकटला वा ‘हॉपर आॅटो’मध्येच टाकावा, त्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची वेळ बदलविण्यात येणार आहे. व्यावसायिक संकुल व व्यावसायिक क्षेत्रात सकाळी १० नंतर घंटीकटले फिरविले जातील. याउपरही जे व्यावसायिक वा दुकानदार उघड्यावर कचरा टाकतील, त्यांचेकडून ‘आॅन द स्पॉट’ ५ हजार रूपये दंड वसूल करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. कचरा जाळणाऱ्यांविरूद्ध सुद्धा दंड व फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
नागरिकांनी पाठवावीत छायाचित्रे
उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांसह कचरा जाळणाऱ्यांची छायाचित्रे अमरावतीकर नागरिकांनी महापालिकेला द्यावीत, व्हॉटस्अॅपवर पाठवावीत, जेणेकरून अज्ञाताविरूद्ध कारवाई न करता थेट त्या दोषीविरूद्ध कारवाई करणे सुलभ होईल, असे आवाहन पालिका आयुक्त हेमंत पवार यांनी केले आहे.