सावित्रीबाईंचा आदर्श घेतल्यास समाजाची प्रगती : पालकमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 05:00 AM2021-01-04T05:00:00+5:302021-01-04T05:01:02+5:30
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८९ व्या जयंतीनिमित्त महिला व बाल विकास विभाग व आर.सी.जे.जे. यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत देशपांडेवाडी येथील शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह येथे ‘सावित्री उत्सव व कौतुक सोहळा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष वंदना चौधरी, बाल न्याय मंडळाचे माधव दंडाळे, विभागीय उपआयुक्त अर्चना इंगोले यांच्यासह आर.सी.जे.जे. चे पदाधिकारी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रत्येक पुरुषाने ज्योतिबा फुले यांचा आणि महिलेने सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेतला, तर स्वतःसह कुटुंबाची व संपूर्ण समाजाची प्रगती निश्चित होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी केले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८९ व्या जयंतीनिमित्त महिला व बाल विकास विभाग व आर.सी.जे.जे. यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत देशपांडेवाडी येथील शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह येथे ‘सावित्री उत्सव व कौतुक सोहळा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष वंदना चौधरी, बाल न्याय मंडळाचे माधव दंडाळे, विभागीय उपआयुक्त अर्चना इंगोले यांच्यासह आर.सी.जे.जे. चे पदाधिकारी उपस्थित होते.
सावित्रीमाई आणि ज्योतिबा होते म्हणून आपण महिला आज विविध क्षेत्रांत आघाडीवर राहून काम करीत आहोत. त्यांच्या कार्यापासून प्रत्येक महिला व पुरुषाने प्रेरणा घेतली, तर संपूर्ण समाज प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही. महिलांच्या उन्नतीसाठी, शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन, सक्षमीकरण आदींसाठी महिला व बाल विकास विभागाकडून राज्यात विविध योजना व उपक्रम अंमलात आणण्यात आले आहेत. पुढील काळात जिल्हा नियोजनातूनही प्राप्त निधीपैकी तीन टक्के निधी हा महिला व बाल विकासासाठी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे पालकमंत्री म्हणाल्या.
विभागीय स्तरावर महिला आयोगाचे कार्यालयसुद्धा लवकरच कार्यान्वित होण्याकरिता शिफारस करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांना व मदतनीस यांना नियमित वेतन अदा करण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचेही ना. ठाकूर यांनी सांगितले.
गुणवंतांचा यशोमती ठाकुरांच्या हस्ते गौरव
कोरोना संकटकाळात अहोरात्र झटणाऱ्या ‘सावित्रीच्या लेकीं’ना गौरविण्यात आले. अंगणवाडी सेविकांना स्मृतिचिन्ह देऊन कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेंतर्गत कुटुंबांना स्मृतिचिन्ह, महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयांतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या पाच बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले. याशिवाय कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या बालकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचे समाजात पुनर्वसन करण्यात आले असून, त्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.