किल्ल्यांचे संवर्धन करणार नसाल तर संभाजी छत्रपतींशी गाठ
By admin | Published: April 24, 2016 12:01 AM2016-04-24T00:01:51+5:302016-04-24T00:01:51+5:30
छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचे संवर्धन करणार नसाल तर संभाजी छत्रपतींशी गाठ आहे, हे याद राखा, असा सणसणीत इशारा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज
छत्रपती संभाजी राजेंचा शासनाला इशारा : श्री शिवशाही महोत्सवाचे थाटात उद्घाटन
अमरावती : छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचे संवर्धन करणार नसाल तर संभाजी छत्रपतींशी गाठ आहे, हे याद राखा, असा सणसणीत इशारा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजे भोसले यांनी येथे शासनाला उद्देशून दिला.
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शनिवारी सायंकाळी शिवसह्यांद्री प्रतिष्ठानाच्यावतीने आयोजित केलेल्या श्री शिवशाही महोत्सवाचे संभाजी राजेंच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. श्रीकांत देशपांडे, आ. यशोमती ठाकूर, माजी आमदार संजय बंड, कोल्हापूरचे गिरीश जाधव, स्मिता देशमुख, शिवराय कुळकर्णी, वैभव वानखडे, बाजार समितीचे उपसभापती किशोर चांगोले यांची उपस्थिती होती.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८६ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने यंदा अमरावतीत प्रथमच शिवशाही महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल संभाजी राजांनी आयोजकांचे भरभरुन कौतुक केले. पक्षभेद विसरुन शिवविचारांच्या या सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी आमदार ठाकूर आणि आमदार देशपांडे यांचेही कौतुक केले.
शिक्षणामध्ये शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची पोपटपंची नको, त्यांच्या गडकिल्ल्यांमधून खरा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहचू शकतो. मात्र शिक्षणप्रणालीमध्ये ते संकुचितरित्या लिहिले जाते. शिक्षणप्रणालीसह सरकारही यासाठी दोषी आहे. महाराजांच्या नावाचा राजकीय वापर करुन येथे प्रत्येक जण आपापली पोळी शेकतो. स्वराज्य हे सुराज्य व्हावे, हा महाराजांचा मूलमंत्र आपण विसरलोय.
आमदारांना सुशिक्षित करा
अमरावती : मी त्यांच्या विचारांचा वारस आहे. खरे शिवभक्त हुडकून काढण्यासाठी बाहेर पडलोय. गोवा आणि सिंधुदुर्गचे बिच पाहण्याऐवजी शिवकालिन किल्ल्यांना भेट द्या, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्रातील ६०० किल्ल्यांचे संवर्धन शक्य नसेल तर केवळ पाच मॉडेल फोर्ट निवडून त्याचे संवर्धन करण्याची सूचना आपण राज्य शासनाला केली असल्याचे राजे म्हणाले. पैसे कुठून उभारायचा, असा सवाल शासनाने केला. ज्यांनी लढायाच लढल्या नाहीत, अशा राजस्थानातील अनेक किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तेथील सरकार पैसे उभारते ना? तेच महाराष्ट्राला का जमू शकत नाही? तुम्हाला जमत नसेल तर स्पष्ट सांगा. आम्ही शिवभक्त कमी नाही. आम्ही करु गडांचे संवर्धन, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार श्रीकांत देशपांडे यांनी छत्रपती संभाजी राजांच्या उपस्थितीने आम्हीच नव्हे तर सभागृह शहारल्याची प्रतिक्रिया दिली. शिवराय कुळकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. शिवकालिन शस्त्रांचे अभ्यासक आणि संकलन गिरीश जाधव यांचा छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदारांना सुशिक्षित केले पाहिजे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला त्यांनी पायदळ उपस्थिती लावली पाहीजे. कॅबिनेटची एक बैठक राज्याच्या राजधानीत रायगडावर व्हायला हवी, असे मत संभाजी राजांनी व्यक्त केले.
व्यासपिठावर यावेळी पंचायत समितीचे सभापती आशीष धर्माळे, बाजार समितीचे संचालक शाम देशमुख, उमेश घुरडे, नगरसेवक दिनेश बूब तथा आयोजक भूषण फरतोडे यांची उपस्थिती होती. शिवशाही महोत्सवाचा हा पहिला-वहिल्या कार्यक्रमाला अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. संचालन क्षिप्रा मानकर, प्रास्ताविक भूषण फरतोडे आणि परिचय गजानन देशमुख यांनी करून दिला. राहुल पाटील ढोक यांनी व्यासपीठावरून छत्रपती शिवरायांचा जयघोष केला.