एक लाख हुंडा आण नाही तर घरातून निघून जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:16 AM2021-08-22T04:16:34+5:302021-08-22T04:16:34+5:30
अमरावती : एक लाख रुपये हुंडा आणून दे, अन्यथा घरातून निघून जा. तू घरातून निघून गेल्यावर आमच्या मुलाचे श्रीमंत ...
अमरावती : एक लाख रुपये हुंडा आणून दे, अन्यथा घरातून निघून जा. तू घरातून निघून गेल्यावर आमच्या मुलाचे श्रीमंत मुलीशी लग्न लावून देतो, असे म्हणून महिलेस पती व सासरच्या मंडळींनी मानसिक व शारीरिक त्रास देऊन छळ केल्याची घटना नांदगावपेठच्या हद्दीत २८ जुलै रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी २० ऑगस्ट रोजी तिघांवर गुन्हा नोंदविला.
पोलीस सूत्रांनुसार, प्रवीण नरेंद्र खोब्रागडे (३६), नरेंद्र खोब्रागडे (७०) व एक महिला (सर्व रा. जुनी वस्ती रहाटगाव) अशी आरोपींची नावे आहे. या संदर्भात पोलिसांकडे एका महिलेने तक्रार नोंदविली. फिर्यादी ही पती, सासू, सासरे यांच्यासोबत संयुक्त कुटुंबात राहत होती. लग्नानंतर महिलेला दोन महिने चांगली वागणूक दिली. त्यानंतर पती कामावर निघून गेले की, सासू व सासरे हे तू कपाळावर कुंकू लावत नाही, हातात बांगड्या घालत नाही, पायात जोडवे घालत नाही, तू पुरुषासारखी राहते तसेच तुझ्या वडिलांनी हुंडा दिला नाही, असे म्हणून मानसिक त्रास देत होते. ही बाब तिने पतीला सांगितली असता, त्यानेसुद्धा आई-वडिलांची बाजू घेतली. त्यानंतर मात्र महिलेस मानसिक त्रास वाढत गेल्याने अखेर तिने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. आरोपीविरुद्ध भादविची कलम ४९८(अ),३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.