नाका-तोंडाला हात लावाल, तर वाजेल सायरन! अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने बनविले यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 07:36 PM2020-05-02T19:36:33+5:302020-05-02T19:37:14+5:30
नाकाजवळ किंवा तोंडाजवळ हात नेताक्षणीच तुम्हाला अलर्ट करणारे सायरन वाजेल, असे यंत्र बडनेऱ्याच्या एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याने तयार केले आहे.
श्यामकांत सहस्त्रभोजने
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: नाकाजवळ किंवा तोंडाजवळ हात नेताक्षणीच तुम्हाला अलर्ट करणारे सायरन वाजेल, असे यंत्र बडनेऱ्याच्या एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याने तयार केले आहे.
नव्या वस्तीच्या रामायणनगर परिसरात राहणारा अभिलाष सुरेश देशमुख याने हे आगळे-वेगळे यंत्र तयार केले. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरणार आहे. अभिलाषचे यंत्र सेंसरद्वारे अलर्ट करणार आहे. चष्म्यात एका ठिकाणी हे यंत्र बसविण्यात आले आहे. हा चष्मा घातल्यानंतर तुम्ही नाक-तोंडाजवळ हात नेत असाल, तर ते तुम्हाला यंत्र अलर्ट करणारा सायरन वाजवेल. हे यंत्र चार्जेबल व आकाराने छोटे आहे. त्याचे वजन जेमतेन ५० ग्रॅम इतके आहे. चष्म्याच्या एका भागाकडून सहज कुठेही फीट करता येते.
कोरोना वॉरियर्ससाठी
कोरोना विषाणूंशी लढणाऱ्या योद्ध्यांंच्या सेवेत सर्वप्रथम यंत्र उपलब्ध करून देण्याचा अभिलाषचा मानस आहे. या यंत्राचा शरीरावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. मास्क लावला असेल, हँडग्लोव्ह्ज घातले असतील किंवा पीपीई किट परिधान केले असेल तरीही हे यंत्र कार्य करणार आहे. एकूणच कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे अभिलाष यांचे म्हणणे आहे.