बोगस खते, बियाणे विकाल तर परवाना निलंबित, तुरुंगात जाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 01:02 PM2024-05-25T13:02:26+5:302024-05-25T13:03:13+5:30
खरीप हंगाम : जिल्ह्यात कृषी विभागाच्या १६ भरारी पथकांचा वॉच
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामाला आठ दिवसात सुरुवात होत आहे. एखादा जोराचा पाऊस झाल्यानंतर शिवारात पेरणीपूर्व मशागतीची व मार्केटमध्ये बियाणे, खतांच्या विक्रीची धुमशान राहाणार आहे. नेमका शेतकऱ्यांच्या लगबगीचा गैरफायदा घेत बोगस रासायनिक खते, बियाणे शेतकऱ्यांचा माथी मारण्याचे प्रकार दरवर्षी होत असल्याचे दिसून येते. यंदा तालुकास्तरावर १४, जिल्हा व विभाग स्तरावर प्रत्येकी एक अशा १६ पथकांचा वाँच राहणार आहे.
त्यामुळे बोगस निविष्ठा विक्रीचा प्रयत्न झाल्यास संबंधित केंद्राचा परवाना रद्द होईल व प्रसंगी तुरुंगातही जाण्याची वेळ येणार आहे. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी कृषी विभागाद्वारा टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे. शिवाय असा प्रकार निदर्शनात आल्यास शेतकऱ्यांना जवळच्या कृषी कार्यालयाकडे तक्रारदेखील करता येते.
बोगस बियाणे, खते विकाल तर खबरदार
कृषी विभागाद्वारा विक्रेत्यांची बैठक घेऊन याविषयी सूचना केल्या आहेत. यानंतरही फसवणूक करण्याचा प्रकार आढळल्यास खपवून घेतला जाणार नाही, असे सांगितले.
शेतकऱ्यांनो, येथे करा तक्रार
कृषी निविष्ठा खरेदी करताना फसवणूक झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना जवळच्या कृषी अधिकारी कार्यालय किंवा टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येते.
प्रत्येक तालुक्यात एक पथक
खरीप हंगामासाठी कृषी विभागाद्वारा प्रत्येक तालुक्यात एका भरारी पथकाचे गठण करण्यात आलेले आहे. या पथकाचा प्रत्येक केंद्रावर वॉच राहणार आहे.
तुरुंगात जाल; परवानाही निलंबित
■ कृषी केंद्रचालकाद्वारा एमआर- पीपेक्षा जास्त दराने निविष्ठांची विक्री केल्यास, बियाणे, रासायनिक खतांचा दर्जा सुमार असल्यास विक्रेत्यांसह कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात येतात.
१७ भरारी पथके ठेवणार वॉच
■ हंगामात प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १४ भरारी पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे.
■ शिवाय जिल्हास्तरावर एक व विभागस्तरावर एक अशा एकूण १७ पथकांचा वॉच राहणार आहे.
शेतकऱ्यांनी परवानाधारक दुकानातूनच कृषी निविष्ठांची
खरेदी करावी व पक्की पावती घ्यावी. बोगस बियाणे, खते असल्यास शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी कार्यालयात तक्रार करावी. -
राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी