डाकसेवक व्हायचे तर सायकल शिका !
By Admin | Published: May 11, 2017 12:10 AM2017-05-11T00:10:14+5:302017-05-11T00:10:14+5:30
सायकलवरून पत्र घेऊन येणारा पोस्टमन प्रत्येकाला आठवतो. हीच परंपरा भारतीय डाक विभाग आजही जपत असल्याचे ...
डाक विभागाची अट : ग्रामीण डाकसेवक पदाची भरती, २१ मे पर्यंत मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सायकलवरून पत्र घेऊन येणारा पोस्टमन प्रत्येकाला आठवतो. हीच परंपरा भारतीय डाक विभाग आजही जपत असल्याचे डाकसेवक पदांच्या जागा भरण्यासाठी डाक विभागाने ठेवलेल्या उमेदवाराला सायकल चालविण्याच्या अटीवरून दिसून येते. एकूण १ हजार ७८९ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले असून त्यासाठी २१ मेपर्यंत आता मुदत देण्यात आली आहे.
पूर्वी सायकलवरून पोस्टमन संपूर्ण गावात पत्र वाटप करायचे. पोस्टमनसाठी सायकल पूर्वीपासूनच महत्वाची साथीदार आहे. परंतु मोटारसायकल आल्यानंतर पोस्टमनकडील सायकलही हटवली गेली. बहुतांश पोस्टमन आज दुचाकीने डाक वाटताना दिसत आहेत. मात्र, डाक विभाग पोस्टमनसाठी सायकलची परंपरा आजही कागदोपत्री जपत आहे. भारतीय डाक विभागाकडून राज्यभर ग्रामीण डाकसेवक पदाच्या जागा भरण्यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ग्रामीण डाकसेवक पदाच्या उमेदवारांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत ६ मे ठेवण्यात आली होती मात्र आता यासाठी २१ मे मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना विविध अटी, शर्ती आहेत. यात उमेदवारांना संगणकाचे ज्ञान आवश्यक असून ६० दिवस मुलभूत संगणकाचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी पोस्टमास्तर म्हणून निवड झाली, त्या गावात राहणे आवश्यक आहे. उमेदवाराला सायकल चालविता येणे आवश्यक असल्याची अट भारतीय डाक विभाग लादल्याने सायकलवर पत्र वाटप करण्याची परंपरा कागदोपत्री टिकवून ठेवत असल्याचे दिसून येते.
विभाग हायटेक अट मात्र पारंपारिक
या संगणकाच्या युगात भारतीय डाक विभागही हायटेक झाला आहे. डाक विभागाने नागरिकांच्या सुविधेकरिता वेगवेगळे संकेतस्थळ निर्माण केले आहेत. ई-पोस्ट, डिजिटल पोस्ट विभाग यासारख्या उपक्रमामुळे डाक विभागही हायटेक झाल्याचे दिसून येते. विभाग हायटेक होऊनही ग्रामीण डाकसेवक पदांच्या जागा भरण्यासाठी अटी मात्र पारंपारिकच ठेवण्यात आल्या आहेत.