कर्जमाफीच्या चर्चेत तूर केंद्रांकडे दुर्लक्ष

By Admin | Published: June 17, 2017 12:02 AM2017-06-17T00:02:04+5:302017-06-17T00:02:04+5:30

जिल्ह्यासह राज्यात रविवारपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी श्रेयवादाची चर्चा रंगली असताना तूर खरेदी केंद्रांकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे.

Ignore Toor Centers in Debt Relief | कर्जमाफीच्या चर्चेत तूर केंद्रांकडे दुर्लक्ष

कर्जमाफीच्या चर्चेत तूर केंद्रांकडे दुर्लक्ष

googlenewsNext

सहा दिवसांपासून केंद्र बंद : पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यासह राज्यात रविवारपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी श्रेयवादाची चर्चा रंगली असताना तूर खरेदी केंद्रांकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. १० जूनपासून जिल्ह्यातील बाराही केंद्रांवर तूर खरेदी बंद आहे. केवळ बाजार समितीमध्ये नोंद केलेली तूर खरेदी करण्यात आली. अद्याप टोकन दिलेली परंतु १८,६४५ शेतकऱ्यांच्या घरात असलेली चार लाख १६ हजार ७९ क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. सलग सहाव्या दिवशीही खरेदी केंद्र बंदच असल्याने मुदतवाढ केव्हा, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.
केंद्र शासनाने जिल्ह्यासह राज्यातील तूर खरेदी केंद्रांना १० जूनपर्यंत १५ हजार मेट्रिक टन तूर खरेदी करण्याची परवानगी दिली. या मुदतीत प्रथम बाजार समितीतील उघड्यावरील तूर खरेदी करण्याची अट घातली. त्यामुळे खरेदी यंत्रणा असलेल्या डीएमओव्दारा ही तूर खरेदी करण्यात आली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर तुरीची मोजणी संपली. मात्र, टोकन दिलेल्या तुरीची खरेदी करण्यात आली नाही.
सध्या मृगाच्या पावसाला सुरूवात झाली आहे. शेतशिवारात पेरणीपूर्व कामांची लगबग वाढली आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी करावी, की तूर मोजणीसाठी केंद्रावर जावे, हा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच नांदगाव खंडेश्वर व धारणी केंद्रावर टीन शेडची सुविधा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. शासनाने केंद्राला त्वरीत मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांकडील नोंद झालेल्या तुरीची खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.

तालुकानिहाय बाकी असलेली तूर खरेदी
सद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर १,७९५ शेतकऱ्यांची ३७,१५२ क्विंटल, अमरावती ३,६५० शेतकऱ्यांची १,०२,४६९, अंजनगाव सुर्जीला २,१४० शेतकऱ्यांची ३५,६०७, चांदूरबाजारला १,२३३ शेतकऱ्यांची २३,५११, चांदूररेल्वेला १,७६९ शेतकऱ्यांची ३३,९७२, दर्यापूरला २,७३८ शेतकऱ्यांची ७४,०५६, धामणगावला ३३३ शेतकऱ्यांची ११,५७३, धारणीला ८४ शेतकऱ्यांची १,१६४, मोर्शीला १,९१५ शेतकऱ्यांची ३४,३४५, नांदगाव खंडेश्वरला १,७९२ शेतकऱ्यांची ९२३ शेतकऱ्यांची २१,१५३ व वरूड केंद्रावर २६४ शेतकऱ्यांची २,१४४ टोकन दिलेल्या तुरीची खरेदी व मोजणी बाकी आहे.

सर्वच केंद्रांवर ३१ मेपर्यंत नोंद झालेली व टोकन दिलेली तूर खरेदी करण्यात आली आहे. अद्याप मुदतवाढीचा आदेश नाही. पावसाळ्यामुळे टप्प्याटप्प्यात तुरीची खरेदी होण्याची शक्यता आहे.
- गौतम वालदे
जिल्हा उपनिबंधक

Web Title: Ignore Toor Centers in Debt Relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.