...अन् संतप्त विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांनाच काढले कार्यालयाबाहेर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 10:42 AM2023-09-06T10:42:41+5:302023-09-06T10:43:48+5:30
वसतिगृह व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : स्वच्छ पिण्याच्या पाण्याअभावी विद्यार्थी पडताहेत आजारी
अमरावती : आदिवासी विकास विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय आदिवासी वसतिगृहात स्वच्छ पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नसल्याने विद्यार्थी आजारी पडत आहेत, तसेच इतरही आवश्यक सोयी- सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी मंगळवारी शहरातील दस्तूरनगर येथील आदिवासी शासकीय वसतिगृहाच्या कार्यालयामध्ये आंदोलन केले. आम्ही आदिवासी असल्यानेच आमच्यावर अन्याय होत असल्याची संतप्त भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. तब्बल तीन ते चार तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढत संताप व्यक्त केला.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शहरी भागात उच्चशिक्षण घेता यावे, याकरिता एक हजार विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वसतिगृह चालविण्यात येत आहे. या वसतिगृहामध्ये शासनाच्या २०११ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक वसतिगृहात स्वतंत्र ग्रंथालय, दहा विद्यार्थ्यांमागे एक कॉम्प्युटर व इंटरनेट सुविधा, प्रत्येक वसतिगृहात स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टर बसविणे, दर महिन्यातून एक वेळा विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करणे, व्यायामासाठी जीमची व्यवस्था करणे, दररोज वसतिगृहाची स्वच्छता, स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तकांची सुविधा, त्याचबरोबर चार ते पाच वृत्तपत्रे, अशा सुविधा देणे अपेक्षित आहे; परंतु शहरातील आदिवासी वसतिगृहात यापैकी कोणत्याच सुविधा नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
यासंदर्भात अनेक वेळा विद्यार्थ्यांनी निवेदन देऊन व आंदोलन करून सुविधा देण्याची मागणी केली; परंतु तरीही कार्यालयाकडून सपशेल दुर्लक्ष होत असल्याने संतप्त ४० ते ५० विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विकास परिषदेच्या नेतृत्वात शहरातील दस्तूरनगरातील मुख्य कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन केले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.
आमचे प्रश्न सोडवू शकत नसाल, तर कार्यालय सोडा
दस्तूरनगर येथील शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या मुख्य कार्यालयात संतप्त विद्यार्थी पोहोचल्यानंतर येथील कर्मचारी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक वादही झाला, तसेच एका कर्मचाऱ्याला विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याची घटनाही याठिकाणी घडल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी संबंधित कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांना जर तुम्ही प्रश्न सोडवू शकत नाही, तर तुम्हाला कार्यालयात राहण्याचाही अधिकार नाही, असे म्हणत कर्मचाऱ्यांना बाहेर हाकलूनही लावले.
शहरातील वसतिगृहे ही भाड्याच्या जागेत सुरू आहेत, त्यामुळे काही प्रमाणात अडचणी असतील. मी दीड महिन्यापूर्वीच जबाबदारी स्वीकारली असून, विद्यार्थ्यांचे हे पहिलेच निवेदन मला मिळाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येईल.
- प्रताप वाडजे, गृहप्रमुख आदिवासी वसतिगृह