भूदानच्या १,६०० एकर जमिनीचे नियमबाह्य वाटप; विदर्भात सर्वाधिक प्रकार
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: March 17, 2023 07:56 PM2023-03-17T19:56:39+5:302023-03-17T19:57:41+5:30
Amravati News राज्यातील आठ जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल प्रकरणांनुसार १,५८९ एकर जमिनीचे नियमबाह्य वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात याची व्याप्ती कित्येक पटीने असल्याचा आरोप होत आहे.
अमरावती : आचार्य विनोबा भावे यांनी देशभर १३ वर्ष भूदान यज्ञाकरिता ५८ हजार किमी यात्रा केली. यामधून प्राप्त जमिनीचे वाटप भूमिहीन शेतमजुरांना होणे महत्त्वाचे आहे. राज्यातील आठ जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल प्रकरणांनुसार १,५८९ एकर जमिनीचे नियमबाह्य वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात याची व्याप्ती कित्येक पटीने असल्याचा आरोप होत आहे.
भूदान चळवळीदरम्यान महाराष्ट्रात १,५१,१६० जमीन दान मिळाली होती. त्यापैकी १,१३,२३० एकर जमिनीचे वाटप करण्यात आलेले आहे. विदर्भात विदर्भ भूदान मंडळ व उर्वरित महाराष्ट्रात महाराष्ट्र ग्रामदान नवनिर्माण समितीकडे भूदान कायद्याच्या अधिन राहून भूमिहीन शेतमजुरांना जमीन वाटप करण्याची जबाबदारी होती. प्रत्यक्षात तरतुदीचा भंग करून आठ जिल्ह्यात ६४३ हेक्टर म्हणजेच १,५८९ एकर जमिनीचे वाटप करण्यात आलेले आहे.यासंदर्भात कित्येक शेतकऱ्यांनी सर्व सेवा मंडळाकडे तक्रार दाखल केल्या आहेत. याशिवाय अध्यक्ष चंदनपाल यांच्याकडे संघाच्याच काही सदस्यांनी घोटाळ्याचे पुरावे दिले आहेत. यासंदर्भात एक वर्षांपासून कोणतीही चौकशी करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.