सिपना वन्यजीव क्षेत्रात अवैध ‘ब्लास्टिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 10:57 PM2017-09-08T22:57:41+5:302017-09-08T22:58:01+5:30
सिपना वन्यजीवांतर्गत सेमाडोह वनपरिक्षेत्रात रात्रीच्या वेळी ब्लास्टिंग करण्यात आले.
श्यामकांत पाण्डेय ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : सिपना वन्यजीवांतर्गत सेमाडोह वनपरिक्षेत्रात रात्रीच्या वेळी ब्लास्टिंग करण्यात आले. या स्फोटांचा मोठा आवाज परिसरात अनेक लोकानी ऐकला. अनेक अफवा देखील पसरल्यात. मात्र, दुसरीकडे असे काहीच झाले नसल्याचा दावा वनअधिकाºयांनी केला आहे.
अमरावती-बुºहाणपूर राज्य महामार्गावरील हरिसाल ते सेमाडोह या भागातील व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करण्यासाठी परतवाडा मार्गावर व्याघ्र प्रकल्पाचा नाका आहे. या नाक्यावर रात्री आठपासून दर दोन तासांच्या अंतराने वाहतूक सोडली जाते. वन्यजीवांच्या मुक्त संचारात बाधा येऊ नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
गुरूवारी रात्री ८.३० वाजता सेमाडोह नाक्यावर वाहने उभी होती. रात्री दहा वाजता वाहने सोडली जातील, असे सांगण्यात आले. रात्री ९ वाजताच्या सुमारास मोठा आवाज झाला. कुठेतरी बाँब फुटल्याचा तर्क यावेळी नाक्यावरील लोकांनी लावला. तर दुसरीकडे नाक्यावर अलेल्या वनकर्मचाºयांनी याप्रकाराची सत्यता उघड केली. जवळच शासकीय योजनेंतर्गत शेतात विहिरीचे बांधकाम सुरू असून तेथे ‘ब्लास्टिंग’ सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. घटनेच्यावेळी सदर प्रतिनिधी स्वत: घटनास्थळी उपस्थित होते. यावरून वन्यजीव क्षेत्रात अवैध ब्लास्टिंग होत असल्याची बाब स्पष्ट झाली.
सेमाडोहला पुनर्वसनाची प्रतीक्षा
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सेमाडोह हे गाव पुनर्वसनासाठी प्रतीक्षारत आहे. काही वर्षांपूर्वी प्रतिकुटुंब १० लाख रूपये देण्याचे ठरले होते. मात्र, पुनर्वसनाला उशिर झाल्याने गावकºयांनी रक्कम वाढविण्याची मागणी केल्याने पुन्हा गावाचे पुनर्वसन रखडले आहे.
पहिलीच घटना
सदर प्रतिनिधी ‘त्या’ विहीरीच्या कामाजवळ पोहोचल्यावर सिपना नदीच्या पुलाला लागूनच एक जेसीबी खोदकाम करून थांबला होता. वाहनाच्या लाईटमुळे ‘ब्लास्टिंग’ करणाºयांनी जंगलात पळ काढला. अतिसंरक्षित व्याघ्र प्रकल्पात ही घटना पहिल्यांदाच उघडकीस आली आहे. वनकर्मचाºयांना विचारपूस केली असता भैसदेही मध्यप्रदेशातील कंत्राटदार जेसीबीद्वारे विहिरीचे बांधकाम व खोदकाम करीत असल्याचे कळले.
आश्रय कुणाचा?
व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात आगपेटीसह इतर ज्वलनशिल पदार्थ घेऊन जाण्यास मनाई असताना मध्यरात्री गोळा-बारूदचा वापर सर्रास सुरू आहे. मात्र, तेथील वनकर्मचारी याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करताना दिसून आले. या अतीगंभीर प्रकाराला वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयाचा आश्रय असल्याशिवाय हा प्रकार शक्य नाही, असे बोलले जात आहे.
ब्लास्टिंगची कोणतीही घटना घडलेली नाही. गोळीबार झाल्याची माहिती मिळाली होती. चौकशी केल्यानंतर ती माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट झाले. ब्लास्टिंगबाबत सर्व अफवा आहेत.
- सुनील शर्मा, उपवनसंरक्षक सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा