मेळघाट वन्यजीव विभागात अवैध वृक्षतोड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 11:17 AM2024-05-18T11:17:45+5:302024-05-18T11:18:20+5:30
Melghat : वनपाल, वनरक्षकाचा सहभाग असल्याचा आरोप, विभागीय वनाधिकाऱ्यांनी मागवला खुलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा :मेळघाट वन्यजीव विभागातील जामली (वन्यजीव) परिक्षेत्रांतर्गत टॅम्ब्रुसोंडा नियत क्षेत्रामध्ये सागवान वृक्षांची अवैध वृक्षतोड करण्यात आली आहे. यात साग चरपट, साग पाटल्या, साग बल्ल्या मिळून एकूण २८ नग जप्त केले. ०.७४३ घनमीटर असलेल्या या लाकडाची किंमत ६६ हजार ५९४ रुपये दाखविण्यात आली आहे.
अग्निरक्षक रोजंदारी मजूर सुरेश मोती कासदेकर व सोनकलाल चंपालाल दहीकर यांच्या घराच्या आवारातून हे अवैध सागवान जप्त करण्यात आले आहे.
रोजंदारी संरक्षण कॅम्प मजूर प्रवीण तुकाराम कासदेकर, शालिकराम भैय्या दहीकर, तेजीलाल चंपालाल दहीकर यांनी त्यांना अवैध वृक्षतोड प्रकरणी सहकार्य केले. या अनुषंगाने भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६ (१) फ इ व ४१, ४२, ५२ अन्वये २८ एप्रिलला प्रथम गुन्हा जारी करण्यात आला आहे. मेळघाटातून वाढती अवैधरित्या लाकूड वाहतूक थांबविणे हे वनविभागापुढे मोठे आव्हान ठरणारे आहे.
अशी ही गंमत
सामूहिक गस्तीदरम्यान अनेकदा संबंधित वनपाल व वनरक्षक अनुपस्थित राहत होते. स्वतः जवळील जीपीएस मशीन मजुरांना सोपवून ते गस्त करण्यास सांगत होते. गस्ती दरम्यान फक्त फोटो काढून हे वनपाल व वनरक्षक माघारी फिरत होते. ते गस्तीवर येत नसल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले आहे.
वनपालासह वनरक्षकांच्या सांगण्यावरून वृक्षतोड
वनपाल आणि वनरक्षकांच्या सांगण्यावरून अवैध वृक्षतोड करण्यात आल्याचे आरोपींनी आपल्या बयानात स्पष्ट केले आहे. खाट (चारपाई), पलंग व इतर सागवान साहित्य तयार करण्यासाठी साग लाकडे जंगलातून तोडून आणण्यास सांगितल्याचे आरोपींनी आपल्या बयानात सांगितले. यात वनपाल राजेश बाळकृष्ण धुमाळे, वनरक्षक भाग्यश्री भास्कर बिहगीर, सुभाष महाटू शेंडे यांच्या नावांचा उल्लेख आरोपींनी आपल्या बयानात केला आहे.
कारणे दाखवा नोटीस
साग वृक्षांच्या अवैध वृक्षतोड प्रकरणात विभागीय वनअधिकारी (मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा) यांनी वनपाल राजेश बाळकृष्ण धुमाळे, वनरक्षक भाग्यश्री बीडगीर, सुभाष महादू शेंडे, सरोस्वती काल्या सेलूकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांचा खुलासा मागविण्यात आला आहे.
संबंधित वनपाल व वनरक्षकांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. खुलासा आल्यानंतर योग्य ती कारवाई प्रस्तावित केल्या जाईल. अवैध वृक्षतोडीचा छडा लावू,
- यशवंत बहाळे, विभागीय वनाधिकारी, मेळघाट वन्यजीव विभाग परतवाडा