हिवरखेड परिसरात रेतीचे अवैध उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 04:02 AM2021-01-05T04:02:03+5:302021-01-05T04:02:03+5:30
महसूल, पोलिसांचे दुर्लक्ष : दारू, मटकाही जोरात हिवरखेड : मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरखेड परिसरात तस्करांनी रेतीच्या अवैध उत्खननाचा ...
महसूल, पोलिसांचे दुर्लक्ष : दारू, मटकाही जोरात
हिवरखेड : मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरखेड परिसरात तस्करांनी रेतीच्या अवैध उत्खननाचा व वाहतुकीचा गोरखधंदा चालविला आहे. बेकायदा वाळूसह सट्टा पट्टी, अवैध गावठी दारूभट्ट्यादेखील फोफावल्या आहेत. प्लास्टिक पन्नीमध्ये व मोठमोठ्या ट्यूबमध्ये गावठी दारू मध्य प्रदेश सीमेहून हिवरखेड तसेच परिसरात आणली जाते. २ जानेवारी रोजी मोर्शी पोलिसांनी पाच हजार रुपयांच्या रेतीसह पाच लाख रुपये किमतीची ट्रॅक्टर ट्रॉली जप्त केली. मात्र, रेती वाहतूक थांबलेली नाही.
बेसुमार वाळू तस्करीने पाक नदीकाठावरील हिवरखेडसह परिसरातील मुबलक पाणी असणारी गावे वाळवंट बनत आहेत. वाळू तस्करांकडून तर शेतामध्ये जाण्याचे मार्गसुद्धा खणले गेले आहेत. या प्रकाराकडे महसूल व पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अवैध धंदे लवकरात लवकर बंद करावे, अशी मागणी हिवरखेड परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.
---------------