कंपोस्ट डेपोतील साग, आडजातीच्या झाडांची अवैध तोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:14 AM2021-02-10T04:14:01+5:302021-02-10T04:14:01+5:30
आरोग्य सभापतींची तक्रार : कारवाईची मागणी वरूड : वरूड नगरपरिषदेच्या टेंभुरखेडा मार्गावरील कंपोस्ट डेपोतील साग आणि अन्य आडजात वृक्ष ...
आरोग्य सभापतींची तक्रार : कारवाईची मागणी
वरूड : वरूड नगरपरिषदेच्या टेंभुरखेडा मार्गावरील कंपोस्ट डेपोतील साग आणि अन्य आडजात वृक्ष अज्ञाताने तोडून नेल्याची तक्रार आरोग्य सभापती सुवर्णा तुमराम व अन्य सभापतींनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. कंपोस्ट डेपो हा विषय आरोग्य सभापतींच्या अखत्यारित येतो.
अवैध तोड व चोरीला गेलेल्या त्या वृक्षांची किंमत अंदाजे २५ लाखांच्या आसपास असल्याचे नमूद असून, संबंधितांवर नगरपरिषदेने कारवाई करावी, अशी मागणी आरोग्य सभापती सुवर्णा तुमराम, शिक्षण सभापती प्रशांत धुर्वे, पाणीपुरवठा सभापती नूरोन्नीसा मो. काझी, महिला बालकल्याण सभापती छाया दुर्गे, नगरसेवक नरेंद्र बेलसरे, रेखा काळे, राजू सुपले यांनी २ फेब्रुवारी रोजी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
झाडे तोडली कुणी?
कंपोस्ट डेपोत चौकीदार असताना आणि दिवसभर घंटागाड्यांची वर्दळ असूनही आठ-दहा सागांसह आडजातीच्या वृक्षांची कत्तल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे, तर डेपोतून कत्तल केलेल्या झाडांची विनापरवाना वाहतूकसुद्धा करण्यात आली. लाकडाची वाहतूक करताना वनविभागाची रीतसर परवानगी घेऊन टीपी पास घ्यावी लागते. परंतु, येथील झाडांची वाहतूक कोणत्या वाहनातून झाली, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.