परसोडा येथील खदानीत आढळले अवैध जिलेटिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 05:00 AM2021-12-12T05:00:00+5:302021-12-12T05:00:56+5:30
परसोडा येथील नीलेश चौरसिया यांच्या मालकीच्या खदानीत अवैध पाच जिलेटिन जप्त करण्यात आले. यावेळी फ्रेजरपुराचे ठाणेदार राहुलकुमार आठवले हे हजर होते. खदानीत नियमबाह्य कारभार सुरू असृून, जिल्हा प्रशासन, खनिकर्म अधिकारी चुप्पी साधून असल्याचा आरोप आमदार राणा यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नजीकच्या परसोडा येथील नीलेश देविदयाल चौरसिया यांच्या मालकीच्या खदानीत अवैध जिलेटिन आढळल्याने शनिवारी एकच खळबळ उडाली. आमदार रवि राणा यांनी स्वत: या खदानीला भेट देऊन नियमबाह्य कामकाजाचे स्टिंग केले. दरम्यान, घटनास्थळी महसूल, पोलीस व बॉम्ब शोधक-नाशक (बीडीडीएस) पथकाला पाचारण करून घटनास्थळ पंचनामा करण्यात आला.
शनिवारी दुपारी २ वाजता मौजा परसोडा येथे गट क्रमांक १७ व १८ चे मालक चौरसिया यांच्या खदानीत आमदार राणांसमवेत जिल्हा परिषद व पं.स. सदस्य व सरपंचांनी पाहणी केली. निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. आय.के. शेख, भूजल सर्वेक्षण अधिकारी जोशी, अव्वल कारकून लंगडे, मंडळ अधिकारी वाय.एम. चतुर, तलाठी जी.डब्ल्यू. निर्मळ हे हजर होते. पंचनाम्याअंती या खदानीत नियमबाह्य बाबी होत असल्याचे स्पष्ट झाले. या पंचनाम्यावर एकूण नऊ पंचांची स्वाक्षरी घेण्यात आली आहे.
पाच जिलेटिन जप्त
परसोडा येथील नीलेश चौरसिया यांच्या मालकीच्या खदानीत अवैध पाच जिलेटिन जप्त करण्यात आले. यावेळी फ्रेजरपुराचे ठाणेदार राहुलकुमार आठवले हे हजर होते. खदानीत नियमबाह्य कारभार सुरू असृून, जिल्हा प्रशासन, खनिकर्म अधिकारी चुप्पी साधून असल्याचा आरोप आमदार राणा यांनी केला.
नियमबाह्य ब्लास्टिंग
महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रत्यक्ष निदर्शनानुसार, ब्लास्टिंगकरिता केलेल्या छिद्रांची खोली ६.१० मीटर आणि रुंदी ८० ते १०० मिलिमीटर अशी नोंद करण्यात आली आहे. ड्रिलिंग बोअर मशीन व बोअर कॉम्प्रेसर खदानीमध्ये आढळून आले. खोदलेल्या खदानीच्या कड्याची उंची तब्बल ६० फुटांच्या वर आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबई येथे मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या जिलेटिन कांड्या आढळल्या होत्या. त्या प्रतिबंधित आहेत. त्यामुळे अवैध ब्लास्टिंग व खनिज साठ्याबाबत चौरसियांना तात्काळ अटक करावी.
- रवि राणा, आमदार, बडनेरा.
परसोडा येथील खदानीतून विस्फोटक साहित्य जप्त करण्यात आले. याबाबत कार्यवाहीची प्रक्रिया सुरू असून, याबाबत प्रशासनाकडून लवकरच निर्णय घेण्यात येईल.
- आशिष बिजवल, निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती.