रायली प्लॉटमधील घरात अवैध हुक्का पार्लर; चार जण ताब्यात
By प्रदीप भाकरे | Published: August 1, 2023 07:50 PM2023-08-01T19:50:49+5:302023-08-01T19:51:07+5:30
स्थानिक रायली प्लॉट परिसरातील एका घराच्या वरच्या माळ्यावर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने ३१ जुलै रोजी सायंकाळी ७:२५ सुमारास धाड टाकली.
अमरावती: स्थानिक रायली प्लॉट परिसरातील एका घराच्या वरच्या माळ्यावर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने ३१ जुलै रोजी सायंकाळी ७:२५ सुमारास धाड टाकली. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शहर कोतवाली ठाण्यातील पोलिस निरीक्षक ज्योती विल्हेकर यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी रात्री ११:०९ च्या सुमारास चौघांविरुद्ध तंबाखू उत्पादन अधिनियम २००३ मधील कलम ४,२१ व भादंविच्या कलम २७० अन्वये गुन्हा दाखल केला.
रायली प्लॉट येथील रहिवासी प्रणय प्रमेंद्र शर्मा हा त्याच्या राहत्या घरातील वरच्या माळ्यावर अवैधरीत्या हुक्का पार्लर चालवित असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पथकाने या हुक्का पार्लरवर धाड टाकली. या कारवाईत प्रणय प्रमेंद्र शर्मा (२४, रा. रायली प्लॉट), गौतम राजेशकुमार सेवानी (२२, रा. अंबिकानगर), भावेश राजेश शर्मा (२१, रा. सिंधी कॅम्प) व अतुल भीमराव जाधव (२१, रा. मोर्शी) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १० हजार रुपये किमतीचे तीन हुक्का पॉट, वेगवेगळ्या प्रकारचे तंबाखूजन्य फ्लेवर, तसेच हुक्क्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य असा एकूण १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलिस उपनिरीक्षक गजानन राजमलू यांच्या पथकाने केली.