अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2017 12:12 AM2017-05-17T00:12:35+5:302017-05-17T00:12:35+5:30
महामार्गावरील दारूबंदीच्या निर्णयानंतर मद्यपींनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे.
पोलिसांचे दुर्लक्ष : दारूबंदीनंतरची परिस्थिती, नागरिकांचे जीवन विस्कळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : महामार्गावरील दारूबंदीच्या निर्णयानंतर मद्यपींनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात दारूचा महापूर आला असून यामुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे.
मोर्शी शहरातील हायवेपासून ५०० मीटरच्या आत असलेले दारू व वाईनशॉपच्या दुकानांना सील करून बंद करण्यात आले. या ठिकाणी केवळ पेठपुरा परिसरातील एकच देशी दारूचे दुकान सुरू असल्याने या ठिकाणी दारू पिणाऱ्यांची दररोज तोबागर्दी दिसत आहे. मोर्शीलगतच असलेल्या पार्डी गावात अवैध दारू विकणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. या ठिकाणी अवैध देशी दारूचा साठा मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने जात असून गावात खुलेआम दारूची विक्री होत आहे. दारू पिणाऱ्यांच्या भीतीमुळे घरातील महिलांना व शाळकरी मुलींना रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. मात्र, पोलीस प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
मोर्शी व आजूबाजूच्या खेड्यांतील दारू शौकिनांचे जत्थेच्या जत्थे पार्डी गावात दाखल होऊन येथेच दारू ढोसून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून तमाशे करीत असल्याने सामान्य नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पार्डी गावात अवैध देशी दारू साठा कोठून उपलब्ध होत आहे, याचा शोध पोलीस प्रशासनाने घेऊन अवैध देशी दारू विक्रीला त्वरित आळा घालावा, अन्यथा या ठिकाणी मोठा उद्रेक होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
५५ रुपयांची पावटी १५० रुपयांत
टाकरखेडा संभू : महामार्गावरील दारूबंदीमुळे ग्रामीण भागात दारूचा महापूर आला आहे. शहरी भागातील पाऊले ग्रामीणकडे वळत असून या संधीचा फायदा घेत ५५ रुपयांची पावटी थेट शंभर ते १५० रुपयांत विक्री केली जात आहे. गावात लग्न समारंभ असल्यास यापेक्षाही जास्त दराने दारूविक्री होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, दारूबंदी असलेल्या टाकरखेडा संभू, रामा, जळका, हिरापूर, साऊर, आष्टी, पुसदा, वलगाव व कामनापूरमध्ये सर्वाधिक दारू विक्री केली जात आहे.
टाकरखेडा संभू परिसरातील पुसदा, साऊर, आष्टी, वलगाव व शिराळा येथील दारूची दुकाने बंद झाल्याने गावात नागरिकांसह महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. परंतु, दारू बंदीनंतर येथे आधीपेक्षाही अधिक अवैध दारू विक्री सुरू झाली. यामुळे गावकरी आणि महिलांमध्ये निराशा व्यक्त होत आहे.