अन् अवैध दारूविक्रेत्यांनी पोलिसांनाच केली मारहाण, आरोपी पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 05:00 PM2022-01-24T17:00:17+5:302022-01-24T17:20:19+5:30
थिलोरी गावात दारूचा अवैध व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईदरम्यान आरोपींनी पोलिसांवरच हल्ला चढवला.
अमरावती : दर्यापूर तालुक्यातील थिलोरी येथील अवैध दारूविक्रेत्यांकडून सहायक निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्यांवरच हल्ला चढविण्यात आला. ही घटना रविवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. या मारहाणीत एपीआय किरण औटे यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. याला आळा घालण्याकरिता पोलीससुद्धा सक्रिय झाले आहेत. दर्यापूर तालुक्यातील थिलोरी या गावात अवैध दारूविक्री होत असल्याची माहिती दर्यापूर पोलिसांना मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक किरण औटे यांच्यासह कर्मचारी नितीन पाटील, रीतेश देशमुख, प्रदीप गणेशे यांनी रविवारी रात्री ८ च्या सुमारास थिलोरी गाव गाठले आणि दारूविक्रेत्याच्या घरी धाड टाकली. यावेळी आरोपीच्या घरात देशी दारूच्या ४० बॉटल आढळून आल्या.
या कारवाईदरम्यान आरोपी अमोल गजानन वानखडे (३०), सुनील नत्थूजी वाकपांजर (४०), अनिल वाकपांजर (४३) व रंजना सुनील वाकपांजर (३८) यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. यानंतर आरोपी अमोलने पोलिसांवर दारूच्या बाॅटलने हल्ला चढवला. थेट चेहऱ्यावर प्रहार झाल्याने किरण औटे यांच्या नाकाला, तर रीतेश देशमुख यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना घटनास्थळाहून हलविण्यात आले.
बाजार चौकातसुद्धा मारहाण
रीतेश देशमुख हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ त्या ठिकाणाहून हलवण्याचा प्रयत्न करीत असताना बाजार चौकातसुद्धा आरोपींनी पोलिसांना मारहाण केली. सर्व आरोपी त्या ठिकाणाहून फरारसुद्धा झाले.
आरोपींविरुद्ध गुन्हा
आरोपी अमोल वानखडे, सुनील वाकपांजर, अनिल वाकपांजर व रंजना वाकपांजर यांच्याविरुद्ध दर्यापूर पोलिसांत विविध कलमान्वये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. फरार आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
थिलोरी गावात दारूचा अवैध व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी पथक पाठविण्यात आले. कारवाईदरम्यान आरोपींनी पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात एपीआय किरण औटेंसह तीन कर्मचाऱ्यांना गंभीर इजा झाली. आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
- प्रमेश आत्राम, पोलीस निरीक्षक, दर्यापूर