अवैध सावकारी, साईनगरातील गुरुजीच्या घरी सहकार विभागाची धाड; अचलपूर सहायक निबंधकांकडील तक्रार
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: November 29, 2023 07:30 PM2023-11-29T19:30:04+5:302023-11-29T19:30:17+5:30
अवैध सावकारीच्या संशयावरून कागदपत्रे जप्त करण्यात आली.
अमरावती: अवैध सावकारीसंदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने येथील साईनगर परिसरातील मोहननगर येथे राहणाऱ्या एका शिक्षकाच्या घरी येथील पथकाने बुधवारी धाड टाकली. यामध्ये अवैध सावकारीच्या संशयावरून कागदपत्रे जप्त करण्यात आली. सदर व्यक्ती अंजनगाव सुर्जी येथील प्रागतिक विद्यालयात माध्यमिक शिक्षक असल्याचे सहकार विभागाने सांगितले.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार रवींद्र भीमराव भागवत (रा. मोहननगर, साई मंदिराजवळ) यांच्याविरुद्ध अवैध सावकारी संदर्भातील तक्रार अचलपूर एआर कार्यालयास प्राप्त झाली. यामध्ये तक्रारकर्ता हे अचलपूर तालुक्यातील रहिवासी आहे. मात्र, भागवत हे अमरावतीला राहत असल्याने तक्रार अमरावती सहायक निबंधकांकडे पाठविण्यात आली. यामध्ये चौकशीत तथ्य आढळल्याने महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ मधील तरतुदीनूसार जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी एक पथक गठित गेले व या पथकाने नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील भागवत यांच्या घरी धाड टाकण्यात आली. या धाडीमध्ये खरेदी खत, इसार पावती, कोरे धनादेश, व्याजाच्या कच्च्या नोंदी असलेल्या डायरी जप्त करण्यात आल्याचे डीडीआर कार्यालयाचे सहकार अधिकारी सुधीर मानकर यांनी सांगितले. ही कारवाई पथकप्रमुख व नांदगाव खंडेश्वरचे सहायक निबंधक सचिन पतंगे, सहायक कर्मचारी अविनाश महल्ले, नीलेश सपकाळ, चेतना कुचे यांनी केली.
अचलपूर एआर करणार कागदपत्रांची पडताळणी
अचलपूर कार्यालयात तक्रार झालेली असल्याने जप्तीमधील सीलबंद कागदपत्रे हे अचलपूर एआर परेश गुल्हाने यांच्याकडे पाठविण्यात आलेली आहे. त्यांच्याद्वारा या कागदपत्रांची पडताळणी व शहानिशा करण्यात येईल. यामध्ये अवैध सावकारी सिद्ध झाल्यास कारवाई होणार आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणीदेखील अचलपूर येथे होणार असल्याचे मानकर यांनी सांगितले.