अपार्टमेंटमध्ये अवैध गुटखा निर्मिती! पोलिसांकडून कारखाना उध्वस्त
By प्रदीप भाकरे | Published: March 14, 2023 07:34 PM2023-03-14T19:34:27+5:302023-03-14T19:34:35+5:30
मशिनसह १६.४७ लाखांचे साहित्य जप्त.
अमरावती : शहरामध्ये चक्क गुटखा निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची धक्कादायक बाब मंगळवारी उघड झाली. गुन्हे शाखेच्या पथकाने एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या त्या गोरखधंद्यावर धाड घालत गुटखा बनविणाऱ्या मशिनसह, अवैध गुटखा तथा कार असा एकूण १६ लाख ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हददीतील एका बारमागे असलेल्या अपार्टमेंटमध्ये अवैध गुटखा तयार केला जात होता. तेथून दोघांना अटक करण्यात आली आहे.
त्या अपार्टमेंटमध्ये काहींनी गुटखा निर्मितीचा कारखाना सरू केल्याची माहिती शहर गुन्हे शाखेला मिळाली. अशा माहितीवरुन गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक नरेशकुमार मुंढे यांच्या पथकाने १४ मार्च रोजी त्या अपार्टमेंटमध्ये धाड घातली. तेथे एका विशिष्ट कंपनीच्या पानमसाला, गुटख्याचे उत्पादन सुरु असल्याचे दिसून आले. तेथून प्रकाश बाबुरावजी बावनकुळे (३८, रा वार्ड नंबर ४, शिराळा, अमरावती) व अंकुश सतिश नावंदर (२९, रा. शिराळा) या दोघांना अटक करण्यात आली.
हे घेतले ताब्यात
त्या कारखान्यातून तयार पानमसाल्याचे २५१ पॅकेट, सुगंधी तंबाखू- ७६० पॅकेट, पॅकिंग करिता तयार ९ पोते खुला पान मसाला, पॅकिंग रोल, गुटखा तयार करण्याच्या पाऊचिंग मशिन, सिलिंग मशिन, पोते सिलाई मशिन, व्होल्टेज स्टॅबिलाईजर मशिन, दोन मोबाईल तथा सहा लाख रुपये किमतीचे वाहन असा एकुण १६ लाख ४७ हजार ४१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील व एसीपी प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा प्रमुख अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, अंमलदार राजुआप्पा बाहेणकर, फिरोज खान, सतिष देशमुख, सुरज चव्हाण निवृती काकड यांनी ही कारवाई केली.