कालव्याच्या कामातील गौणखनिजाची अवैध विक्री
By admin | Published: April 10, 2017 12:24 AM2017-04-10T00:24:54+5:302017-04-10T00:24:54+5:30
तालुक्यातील धनोडीलगत वनउद्यानानजीक वर्धा डायव्हर्शन कॅनालचे खोदकाम सुरू आहे. यातून निघणारा हजारो ब्रास मुरूम विनापरवानगी विकला जात आहे.
मुरूम चोरी प्रकरण : नोटीस बजावूनही कारवाई थंडबस्त्यात
वरूड : तालुक्यातील धनोडीलगत वनउद्यानानजीक वर्धा डायव्हर्शन कॅनालचे खोदकाम सुरू आहे. यातून निघणारा हजारो ब्रास मुरूम विनापरवानगी विकला जात आहे. यासोबतच परवाना नसताना चोरीच्या मार्गाने याची वाहतूक केली जात आहे.
मुरुमाची तस्करी करताना महसूल अधिकारी किंवा फिरते पथकाला सुगावा लागू नव्हे, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. यासाठी विविध ठिकाणी रोंजदारीची मानसे ठेवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गौनखनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांनी स्वत:चे नेटवर्क स्थापित केले असून याला पोलीस व महसूल विभागातील काही लोकांची साथ मिळत असल्याची चर्चा सध्या तालुक्यात आहे.
अवैधरीत्या होणारी गौनखनीजाची वाहतुकीची माहिती मिळाल्यावर त्यांच्यावर अधिकृत कार्यवाही न करता हजार-दोन हजार रुपयांत ट्रक-टॅ्रक्टरला सोडून देण्यात येते. अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. मात्र, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)
आदेशानंतरही दुर्लक्ष
रेल्वेच्या कामासाठी चोरीचा मुरूम वापरण्यात येत असल्याची माहिती उघड झाल्यावर याप्रकरणी तहसीलदार आशिष बिजवल यांनी संबंधिताना नोटीस बजावल्या होत्या. मात्र यासंदर्भातील अहवाल अद्याप सादर करण्यात आला नसल्याची माहिती आहे. तहसीलदारांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतरही कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चिरीमिरीचा व्यवहार फोफावतोय
चार दिवसांपूर्वी तालुक्यातील पुसला मार्गावर मध्यप्रदेशातून रेतीची वाहतूक करणारे चार रेतीचे ओव्हरलोड ट्रक महसूल विभागाच्या तलाठ्यांनी पकडले. परंतु, चिरीमिरी करून त्यांना सोडून दिल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कुणाचे नियंत्रण आहे, असाही प्रश्न केला जात आहे.