दुर्मीळ प्रजातीच्या कासवांची विक्री; मोर्शीत आठ, मध्य प्रदेशातून ११ कासव जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 04:34 PM2023-01-12T16:34:51+5:302023-01-12T16:36:22+5:30
वनविभागाची कारवाई
मोर्शी (अमरावती) : शहरातील जलपरी एक्वेरियम नामक दुकानातून मोर्शी वनविभागाने गोपनीय माहितीवरून धाड घालून दुर्मीळ प्रजातीचे आठ कासव जप्त केले. तेथून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातील बैतूल येथून याच दुर्मीळ प्रजातीचे ११ कासव असे एकूण १९ कासव जप्त करण्यात आले आहेत.
सचिन द्रुपालराव रवाळे (३५, रा. मोर्शी) याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आदित्य अरविंद भुसारी (२४, रा. आठनेर, जि. बैतूल) याला ताब्यात घेतले. त्याने कासव पलाश हरीश तायवाडे (रा. बैतूल, मध्य प्रदेश) याच्याकडून विकत घेतल्याचे कबूल केले. पलाशकडे ग्राहक बनून वनविभागाचे कर्मचारी गेले आणि पलाशचा भाऊ रिषभ तायवाडे (३०) याला दुर्मीळ प्रजातीच्या ११ नग कासवासह अटक केली. प्रकरणातील चौथा आरोपी पलाश हरीश तायवाडे याला मुंबई येथे अटक करून ताब्यात घेतले असल्याचे येथील वनअधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईदरम्यान एकूण १९ कासव, प्राण्यांची तस्करी व अवैध वाहतुकीकरिता वापरलेल्या तीन मोटारसायकल व तीन मोबाइल फोन जप्त करण्यात आले.
मुख्य वनरक्षक अनारसे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. मोर्शीतील ज्या ग्राहकांनी कासवाची खरेदी केली आहे, त्यांनी ते नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी केले. सचिन रवाळे याचा व्यवसाय २०१९ पासून सुरू असल्याची तसेच हे कासव हे पश्चिम बंगालमार्गे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात तस्करीच्या माध्यमातून आणले असल्याची माहिती पुढे आली आहे.