खुल्या जागेवर अवैध रेती साठवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 05:00 AM2020-12-18T05:00:00+5:302020-12-18T05:00:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कन्हान वाळूची महानगरात मोठ्या प्रमाणात अवैध साठवण केली जात आहे. वहन परवान्यापेक्षा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कन्हान वाळूची महानगरात मोठ्या प्रमाणात अवैध साठवण केली जात आहे. वहन परवान्यापेक्षा जास्त वाळूची शेकडो वाहनांद्वारे वाहतूक केली जात आहे. महानगरात खुल्या जागांवर कन्हान रेती साठवण करून राजरोसपणे व्यवसाय सुरू आहे. यात मोठे ‘अर्थकारण’ असल्याने महसूल विभागाचा छुपा ‘आशीर्वाद’ असल्याचे बोलले जात आहे. या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकारी शैलेश नवाल लक्ष देतील काय, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
वर्धासह अन्य नदी पात्रातून रेती उपशाला स्थगिती आहे. त्यामुळे तस्करांनी कन्हान रेती व्यवसायाकडे मोर्चा वळविला. येथील वलगाव मार्गावरील नवसारी रिंगरोड, रहाटगाव टी-पॉईंट, नांदगाव पेठ या मार्गावर कन्हान रेतीची नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या ट्रकना पोलीस, आराटीओ आणि महसूल विभागाची मूक संमती आहे. कन्हान रेतीचा नागपूर, वर्धा व अमरावती असा नियमबाह्य प्रवास निरंतरपणे सुरू आहे. कन्हान नदीपात्रातून रॉयल्टी चार ब्रास क्षमतेची घ्यायची, मात्र १६ ते २० ब्रास रेती ट्रकमध्ये आणायची, असा हा नियमबाह्य प्रकार सुरू आहे. वर्धा, बेंबळा, पेढी व पूर्णा नदीपात्रातून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती आहे.
हल्ली कन्हान वाळू माफियांच्या अर्थकारणाचे केंद्र बनले आहे. खुल्या जागांवर रेती गोळा करायची आणि ती बांधकामासाठी विकायची, अशी शक्कल लढविली जात आहे. दोन ब्रास कन्हान रेतीसाठी १४ ते १६ हजार रुपये मोजावे लागत आहेत. नवसारी रिंगरोड, बडनेरा येथील जुनीवस्ती, फ्रेजरपुरा, दंत महाविद्यालय मार्ग, महादेवखोरी, वलगाव मार्ग, ॲकेडमिक स्कूलचा परिसर, बडनेरा नजीकचे कोंडेश्वर मार्ग, शासकीय विश्रामगृह समोरील परिसर, रहाटगाव आदी भागात रेती साठवून ठेवली आहे.
वाळू तस्करीचे मोठे रॅकेट
खुल्या जागेवर वाळू साठवणे आणि वेळप्रसंगानुसार ती वाहनाद्वारे विक्री करणे हा नवा फंडा वाळू व्यावसायिकांनी सुरू केला आहे. हल्ली शहरात दरदिवशी ४० ते ५० ट्रकद्धारे कन्हान वाळू शहरात आणली जात आहे. ट्रकमधून रेती आणणारे आणि शहरात ती विक्री करणारे असे दोन घटक कार्यरत आहेत. खुल्या जागेवर रेती साठवून ठेवता येत नाही. तरीही हे कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वाळू वाहतूकप्रकरणी संबंधितांकडे रॉयल्टी असेल, तर ते नियमबाह्य मानले जात नाही. मात्र, वहनक्षमतेपेक्षा जास्त रेतीचा वाहतूक हाेत असेल, तर अशा प्रकरणी कारवाई केली जाईल. रेती साठवण स्थळांवर धाडसत्र राबवून रॉयल्टी तपासण्यात येईल.
- शैेलेश नवाल,
जिल्हाधिकारी, अमरावती.